Chicken Tikka Masala Inventor Death: ‘चिकन टिक्का मसाला’चा शोध लावणारे अली अहमद असलम यांचं निधन झालं आहे. ते ७७ वर्षांचे होते. ग्लासगो येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अली अहमद असलम यांचं निधन झाल्याचं त्यांच्या शीशमहल रेस्तराँने जाहीर केलं आहे. ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, अली अहमद असलम यांच्या आदरार्थ रेस्तराँ ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. “आज सकाळी मिस्टर अली यांचं निधन झालं आहे. आम्हा सर्वांना धक्का बसला आहे”, असं रेस्तराँने म्हटलं आहे.
अली अहमह असलम यांनी १९७० मध्ये टोमॅटो सूपच्या सहाय्याने ‘चिकन टिक्क मसाला’ या डिशचा शोध लावला होता. त्यांच्याच शीशमहल रेस्तराँमध्ये हा शोध लावण्यात आला होता.
सोमवारी सकाळी त्यांचं निधन झाल्याचं त्यांचा पुतण्या अहमद यांनी सांगितलं आहे. “ते नेहमी आपल्या रेस्तराँमध्ये दुपारी जेवायचे. हे रेस्तराँ त्यांचं आयुष्य होतं. आचारी त्यांच्यासाठी नेहमी करी करायचे. पण ते रोज चिकन टिक्का मसाला खायचे की नाही याची मला कल्पना नाही,” असं अहमद यांनी सांगितलं आहे.
२००९ मध्ये अली अहमह असलम यांनी AFP ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, एका ग्राहकाने चिकन टिक्का फारच कोरडं असल्याची तक्रार केल्यानंतर आपण चिकन टिक्का मसालाचा शोध लावला होता. “चिकन टिक्का मसालाचा शोध याच रेस्तराँत लावण्यात आला आहे. आम्ही येथे चिकन टिक्का बनवत होतो. पण एक दिवशी ग्राहकाने हे फार कोरडं असून सोबत सॉस हवं असं सांगितलं. यानंतर आम्ही सॉसचा वापर करुन चिकन शिजवण्याचा विचार केला,” अशी माहिती अली यांनी दिली होती. ही डिश ब्रिटीश रेस्तराँमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाली होती.
अली हे मूळचे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील होते. ते लहान असताना कुटुंब ग्लासगो येथे स्थलांतरित झालं होतं. अली यांनी १९६४ मध्ये शीशमहल रेस्तराँ सुरु केलं. अली यांच्यामागे पत्नी, तीन मुलं आणि दोन मुली आहेत.