काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी राष्ट्रपती आणि २००८-०९ मध्ये अर्थमंत्री असंलेल्या प्रणव मुखर्जी यांना जबाबदार ठरवले आहे.
चेन्नई येथील अर्थविषयक संमेलनात मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करताना चिदंबरम यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, देशाला मंदीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मुखर्जी यांनी २००८-०९ मध्ये प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली होती. या पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, असा मुखर्जींना विश्वास होता. मात्र, हे पॅकेज काँग्रेससाठी घातक ठरल्याचा दावा चिदंबरम यांनी या वेळी केला.  पॅकेज जाहीर करताना वित्तीय संकेतांचा भंग झाला. या पॅकेजमुळे वित्तीय तूट मोठ्या प्रमाणावर वाढली आणि परिणामी महागाईचा दर १४ टक्क्यांपेक्षा जास्त झाला. अखेरीस २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला नाकारले आणि पराभव झाला असेही त्यांनी म्हटले आहे.

Story img Loader