Tahawwur Rana Case: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा याला अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर काँग्रेस आणि भाजपामध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे. तहव्वूर राणाला भारतात आणल्याचे श्रेय घेतल्याबद्दल काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी गुरुवारी मोदी सरकारवर टीका केली आणि म्हटले की, हे “यूपीए सरकारच्या काळात या प्रकरणी केलेल्या कामाचे परिणाम आहेत.

मोदी सरकारने…

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर बोलताना चिदंबरम म्हणाले की, “मी हे स्पष्ट करतो की, मोदी सरकारने ही प्रक्रिया सुरू केली नाही किंवा त्यांना यामध्ये कोणताही नवीन यश मिळाले नाही. त्यांना फक्त यूपीएच्या काळात सुरू झालेल्या परिपक्व, सातत्यपूर्ण आणि धोरणात्मक राजनैतिकतेचा फायदा झाला. हे प्रत्यार्पण कोणत्याही दिखाव्याचा परिणाम नाही, तर राजनैतिकता, कायदा अंमलबजावणी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रामाणिकपणे आणि कोणत्याही प्रकारे छाती न ठोकता केले तर भारतीय राज्य काय साध्य करू शकते याचा हा पुरावा आहे.”

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर हुसेन राणाला अखेर भारतात आणण्यात आले असून, त्याला अमेरिकेतून भारतात आणण्याची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. यामध्ये एनआयएचे महानिरीक्षक आशिष बत्रा उपमहानिरीक्षक जया रॉय यांचा समावेश होता. या दोन्ही अधिकाऱ्यांनी राणाची अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

एनआयएचे हे पथक तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी रविवारीच अमेरिकेत पोहोचले होते. मंगळवारी संध्याकाळी लॉस एंजेलिसमध्ये उपमहानिरीक्षक जया रॉय यांनी राणाला ताब्यात घेण्यासाठी ‘सरेंडर वॉरंट’वर स्वाक्षरी केली होती. यानंतर, भारतीय पथकाने बुधवारी सकाळी राणाला एका खास विमानाने भारताकडे रवाना केले होते. या कारवाईत इतर तीन गुप्तचर अधिकाऱ्यांनीही सहकार्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण आहे तहव्वूर राणा?

तहव्वूर राणा हा पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिक असून, त्याला अमेरिकेत बंदी घातलेल्या दहशतवादी संघटने लष्कर-ए-तैयबाचे काम केल्याबद्दल आणि २६ ते २९ नोव्हेंबर २००८ दरम्यान मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी लष्कर-ए-तैयबाला मदत केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. दरम्यान मुंबई दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दल, नागरिक आणि परदेशी पर्यटकांसह १७४ हून अधिक लोकांचा बळी गेला होता.