भारतीय निवडणूक आयोगाने आज (९ ऑक्टोबर) पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केलं असून सर्वात आधी मिझोराममध्ये १३ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सर्व पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान वेगवेगळ्या दिवशी होईल. परंतु, पाचही राज्यांची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी केली जाणार आहे.
मिझोराम विधानसभा निवडणुकीचं मतदान ७ नोव्हेंबर रोजी होईल. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान तर १७ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेतलं जाणार आहे. मध्यप्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर, राज्यस्थानमध्ये २३ नोव्हेंबर आणि तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया राबवली जाईल. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.
दरम्यान, यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी निवडणूक आयुक्तांना जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांबद्दल प्रश्न विचारला. यावर निवडणूक आयुक्त म्हणाले, या केंद्रशासित राज्यातील सुरक्षेची परिस्थिती आणि आणि अन्य राज्यांच्या एकत्रितपणे होणाऱ्या निवडणुका पाहता जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीसाठी योग्य वेळ निश्चित केली जाईल.
जम्मू-काश्मीरमध्ये शेवटची विधानसभा निवडणूक २०१४ मध्ये झाली होती. त्यानंतर भाजपा आणि पीडीपीने युती करून जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केली. परंतु २०१८ मध्ये मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट सुरू झाली. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
हे ही वाचा >> “…तेव्हा यांना नग्न करेन”, संजय शिरसाटांचा ठाकरे गटाला इशारा; म्हणाले, “मला एकनाथ शिंदेंनी…”
केंद्र सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू काश्मीरमधील कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवलं. त्याचबरोबर जम्मू काश्मीर या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार झाले. तेव्हापासून जम्मू-काश्मीरचा कारभार उपराज्यपाल पाहत आहेत. मनोज सिन्हा हे राज्याचे उपराज्यपाल आहेत.