देशात ७ एप्रिलपासून १२ मेपर्यंत एकूण नऊ टप्प्यांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. १६ मे रोजी लोकसभा आणि आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. आजपासूनच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितले. विविध घटकांचा विचार करून नऊ टप्प्यांत मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याचे संपथ यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात १०, १७ आणि २४ एप्रिलला तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १० एप्रिलला बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली-चिमूर या ठिकाणी मतदान होईल. दुसऱया टप्प्यात १७ एप्रिलला हिंगोली, नांदेड, परभणी, मावळ, पुणे, बारामती, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले, कोल्हापूर, माढा या मतदारसंघात मतदान होणार आहे. तिसऱया टप्प्यात मुंबईतील सर्व मतदारसंघांबरोबरच नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, औरंगाबाद, दिंडोरी, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, नाशिक, भिवंडी, जालना या मतदारसंघांमध्ये मतदान होईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा पहिल्यांदाच मतदारांना ‘वरीलपैकी कोणीही नाही’ (nota) हा पर्यायही उपलब्ध असणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच या पद्धतीने मतदारांना नवा पर्याय मिळणार आहे. त्याचबरोबर मतदान केल्यानंतर मतदारांना कागदी पोचही मतदानयंत्रातून मिळणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रावरील मतदारांचा विश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
देशात यावेळी ८१.४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार
गेल्यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारांमध्ये १० कोटींची वाढ
मतदानासाठी सर्वत्र इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर
१५ व्या लोकसभेची मुदत १ जून रोजी संपते आहे. त्यापूर्वी निवडणुकीचा कार्यक्रम संपविण्याची निवडणूक आयोगावर जबाबदारी
मतदानासाठी देशात ८ लाख ३० हजार मतदानकेंद्रे
निवडणुकीत पैशांचा वाढता वापर हा निवडणूक आयोगासाठी काळजीचा विषय. पैशांचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या विविध उपाययोजना
अद्याप मतदार नोंदणी न केलेल्यांसाठी ९ मार्च रोजी विशेष मतदार नोंदणी मोहीम
मतदानाचे टप्पे राज्ये आणि लोकसभा मतदारसंघांची यादी पुढीलप्रमाणे
७ एप्रिल – २ राज्ये, ६ मतदारसंघ
९ एप्रिल – ५ राज्ये, ७ मतदारसंघ
१० एप्रिल – १४ राज्ये, ९२ मतदारसंघ
१२ एप्रिल – ३ राज्ये, ५ मतदारसंघ
१७ एप्रिल – १३ राज्ये, १२२ मतदारसंघ
२४ एप्रिल – १२ राज्ये, ११७ मतदारसंघ
३० एप्रिल – ९ राज्ये, ८९ मतदारसंघ
७ मे – ७ राज्ये, ६४ मतदारसंघ
१२ मे – ३ राज्ये, ४१ मतदारसंघ

Story img Loader