पश्चिम बंगालमध्ये कथितरित्या होत असलेल्या राजकीय हत्यांविरोधातील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी भाजपा आणि पश्चिम बंगाल सरकारला चांगलेच झापले. ”राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोर्टाचा वापर करू नका, हेच करायचं असेल तर टीव्ही चॅनेल्सवर जा.” असं सणसणीत उत्तर सरन्यायाधीश बोबडे यांनी दिलं.
भाजपाचे प्रवक्ते गौरव बन्सल यांनी पश्चिम बंगालमध्ये कथितरित्या होत असलेल्या राजकीय हत्यांविरोधातील याचिका केली आहे. त्यावर सोमवारी सुनवाणी झाली. भाजपाच्या वतीनं ज्येष्ठ वकील गौरव भाटिया बाजू मांडत होते, तर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल पश्चिम बंगालमधील तृणमूल सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टात उभे होते.
या याचिकेला कपिल सिब्बल यांनी विरोध केला. एखादा राजकीय पक्ष याचिका करू शकते का, हे कोर्टानं तपासावं, असं कपिल सिब्बल यांचं मत होतं. त्यावर सरन्यायाधीश बोबडे म्हणाले, आम्हाला कल्पना आहे की दोन्ही बाजूचे लोक राजकीय पोळी भाजण्यासाठी कोर्टाचा वापर करत आहेत. असं काही करण्यापेक्षा तुम्ही टीव्ही चॅनेल्सवर जा. तेथे तुम्हाला जी प्रसिद्धी मिळवायची ती मिळवा.
आणखी वाचा – समाजसेवा करा; गुजरात दंगलीतील आरोपींना जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
पश्चिम बंगालमधील भाजपा कार्यकर्ता दुलाल कुमार याची हत्या झाली होती. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशा मागणीची याचिका दुलालच्या कुटुंबानेही केली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टाने तृणमूल सरकारला चार आठवड्यात आपलं मत मांडायला सांगितलं आहे.