देशात करोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण सूरु आहे. दरम्यान १८ ते ४५ वयोगटातील सुमारे एक कोटी ५७ लाख लोकांना मोफत लस देण्याची विनंती झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. करोना महामारीचा सामना करत असलेल्या झारखंडला यासाठी सुमारे ११०० कोटी रुपये खर्च करणे शक्य नसल्याचे हेमंत सोरेन म्हणाले.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले, राज्यातील १८ वर्ष ते ४५ वर्षांपर्यंत वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे ११०० कोटी खर्च येइल. तसेच १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना लस उपलब्ध होताच एक हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गरज भासू शकेल.
करोना साथीच्या आजारामुळे आधीच आर्थिक पेचप्रसंगामुळे झारखंडला आपले संकुचित संसाधने स्वतंत्रपणे खर्च करणे फार कठीण जाईल. राज्यातील करोनाविरूद्ध लसीकरण मोहिमेतील कमी लसींचा पुरवठा हे सर्वात मोठे आव्हान बनले आहे, ज्यावर मात करण्याची आवश्यकता असल्याचे हेमंत सोरेन आपल्या पत्रात म्हणाले.
Jharkhand CM Hemant Soren wrote to PM Modi requesting to provide free vaccine for beneficiaries of all age groups & give freedom to define priorities for vaccination coverage pic.twitter.com/nUz7bzHsm5
— ANI (@ANI) June 1, 2021
देशात करोनाची दुसरी लाट ओसरतेय
देशात करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या दुसऱ्या लाटेना देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. देशात गेल्या २४ तासात १,२७,५१० रुग्ण आढळले. ही गेल्या ४८ दिवसातील सर्वात कमी संख्या आहे. तसेच मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील घट होतांना दिसत आहेत. गेल्या २४ तासात २,७९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २,५५,२८७ जणांनी करोनावर मात केली आहे. डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील दररोजची आकडेवारी जाहीर करण्यात येते. गेल्या २४ तासांतील करोना परिस्थितीबद्दलचे आकडे मंत्रालयाने प्रसिद्ध केले असून, दिलासादायक चित्र दिसत आहे. आतापर्यंत देशात २,८१,७५,०४४ करोना रुग्ण आढळले. तर यापैकी २,५९,४७,६२९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. ३,३१,८९५ रुग्णांचा करोनामुळे मुत्यू झाला आहे. सध्या देशात १८,९५,५२० करोना बाधित रुग्ण आहेत.