त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांना जीवे मारण्याची धमकी फेसबुक पोस्टद्वारे देण्यात आली आहे. इतकेच नाही तर त्यांचे शिर कापून आणणाऱ्यास ‘इनाम’ देण्यात येईल, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. फेसबुक पोस्ट टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पश्चिम आगरतळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्री सरकार यांना फेसबुकवरून धमकी देणाऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. सायबर विभागातील तज्ज्ञांच्या मदतीने त्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख अभिजीत सप्तर्षी यांनी ‘आयएएनएस’ला दिली. पोलिसांनी ही पोस्ट तातडीने फेसबुकवरून काढली आहे. थोडा वेळ लागेल, पण पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला नक्कीच शोधून काढू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
साडेपाच लाखांचा ‘इनाम’
रिना रॉय या नावाने फेसबुक अकाऊंट उघडण्यात आले आहे. मुलीचा फोटो प्रोफाईलला ठेवण्यात आला आहे. मात्र, यूजर्सची व्यक्तिगत माहिती प्रोफाईलमध्ये देण्यात आलेली नाही. आपण वर्ल्ड अॅँटी कम्युनिस्ट कौन्सिलचा कार्यकर्ता असल्याचा उल्लेख त्यात केला आहे. या अकाऊंटवरून केलेल्या पोस्टमधून माणिक सरकार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांचे शिर कापून आणणाऱ्या व्यक्तीला साडेपाच लाख रुपये इनाम म्हणून देण्यात येतील, असे त्यात म्हटले आहे.