नवी दिल्ली : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी नकार दिल्यामुळे मंगळवारी रात्री उशीरापर्यंत कोंडी फुटलेली नाही. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपली मोर्चेबांधणी केली असून तेदेखील माघार घेण्याची शक्यता नसल्याने आता माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी बुधवारी दिल्लीत परतल्यानंतरच अंतिम तोडगा निघू शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सोमवारी प्रकृतीच्या कारणास्तव दिल्लीत येणे टाळणारे शिवकुमार मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास राजधानीत दाखल झाले. त्यांनी खरगे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. शिवकुमार निघून गेल्यानंतर सोमवारपासून दिल्लीत असलेले सिद्धरामय्याही खरगेंच्या भेटीला गेले. यापूर्वीही त्यांनी खरगेंशी दोन वेळा सविस्तर चर्चा केली आहे. खरगे यांच्या निवासस्थानी दिवसभर चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्यात समेट घडवण्याच्या प्रयत्नांना यश आले नसल्याची माहिती आहे. या दोघांनीही खरगेंशी झालेल्या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी खरगेंच्या निवासस्थानी पक्षाध्यक्षांसह रणदीप सुरजेवाला, के. सी. वेणुगोपाल यांच्याशी सुमारे दोन तास चर्चा केली. मात्र, राहुल गांधींनी सिद्धरामय्या तसेच, शिवकुमार यांची भेट घेतलेली नाही. या दोघांनाही दिल्लीतच राहण्याची सूचना खरगेंनी केली असल्याचे समजते.
‘खरगेंनी दोन्ही दावेदारांशी तसेच, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत केली असली तरी त्यांना अजून कोणत्याही एका नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही’, अशी माहिती या घडामोडींशी निगडीत सूत्रांनी दिली. बहुतांश नवनियुक्त आमदारांचा सिद्धरामय्यांना पाठिंबा असल्याने त्यांचे नाव आघाडीवर असले तरी, खरगेंशी झालेल्या चर्चेमध्ये शिवकुमार यांनी सिद्धरामय्यांच्या नावाला कडाडून विरोध केल्याचे समजते. दोन्ही नेत्यांनी आमदारांच्या पाठिंब्याचे गणित मांडले असून शिवकुमार यांना लिंगायत, वोक्कलिगा या दोन्ही प्रभावी समाजातील आमदारांचे समर्थन आहे. सिद्धरामय्यांना लिंगायत आमदारांचा फारसा पाठिंबा नाही. मात्र त्यांनी समर्थक आमदारांची जुळवाजुळव केल्यामुळे स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. खरगेंनी दोन्ही नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरही मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कोंडी फुटू शकली नाही. सोनिया गांधी दिल्लीबाहेर असून त्या बुधवारी परतणार आहेत. त्यानंतरच खरगेंची त्यांच्याशी चर्चा होईल आणि मार्ग काढला जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या नवनियुक्त आमदारांची मते जाणून घेणाऱ्या नेमण्यात आलेल्या तीनही निरीक्षकांनी खरगेंना अहवाल सादर केले असून त्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्यांना अधिक पसंती असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शिवकुमार यांची समजून घालून मंगळवारी संध्याकाळपर्यंत घोषणा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केल्यास त्याचा परिणाम काय होईल, याची चाचपणीही पक्षाकडून केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. सिद्धरामय्यांच्या कार्यकाळात काँग्रेस सरकारच्या प्रशासनावर टीका झाली होती. त्यांना मुख्यमंत्री केल्यास लिंगायत मतदार लांब जाण्याची भीती असून दहा महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो.
शिवकुमार यांची बाजू
कर्नाटकमध्ये काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून दिली असल्याने मुख्यमंत्री पदावर आपलाच हक्क असल्याचे शिवकुमार यांचे म्हणणे आहे. आपण सोनिया गांधींचे निष्ठावान असल्याचे ते वारंवार बोलून दाखवत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोनिया गांधींचे मत जाणून घेतल्यानंतर सुटू शकतो, असे शिवकुमार यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे.