पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. तसेच, ”भाजपाने आपल्या देशाच्या सांघिक रचनेवर वारंवार हल्ला केला आहे आणि आता या जुलमी राजवटीचा एकजुटीने सामना करण्याची वेळ आली आहे.” असे म्हणत त्यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपाचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पत्रात लिहिले आहे की, “ईडी, सीबीआय, केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) आणि प्राप्तिकर विभाग या सारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर सूड उगवण्यासाठी, देशभरातील राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी, छळण्यासाठी आणि कोंडीत पकडण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून भाजपाला केंद्रीय संस्थांचा गैरवापर करण्यापासून रोखले पाहिजे. निवडणुका जवळ आल्या की केंद्रीय संस्था कामात उतरतात.”
तसेच या पत्रात ममता बॅनर्जी यांनी लिहिलं आहे की, “माझा मनात न्यायव्यवस्थेबद्दल सर्वोच्च आदर आहे. मात्र सध्या काही पक्षीय राजकीय हस्तक्षेपामुळे लोकांना न्याय मिळत नाही, जे आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे आणि जनता हे आपल्या लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचे स्तंभ आहेत आणि कोणत्याही भागाला तडा गेला तर संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडते.”
या पत्रात ममता बॅनर्जी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे की, “माझी विनंती आहे की आपण सर्वांनी सर्वांच्या सोयीनुसार एका ठिकाणी एकत्र येऊन पुढील मार्गावर चर्चा करावी. सर्व पुरोगामी शक्तींनी एकत्र येऊन या दडपशाहीचा मुकाबला करावा, ही देशाची गरज आहे.” मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशभरातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही विनंती केली आहे.