रशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या तेल कंपनीच्या मालकाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ‘लुकोईल’ या तेल कंपनीचे प्रमुख रविल मॅगनोव यांचा मॉस्कोतील एका रुग्णालयाच्या खिडकीतून पडून मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. १९९३ साली ‘लुकोईल’ कंपनीच्या स्थापनेपासून ६७ वर्षीय मॅगनोव या कंपनीत कार्यरत होते. दरम्यान, गंभीर आजारामुळे मॅगनोव यांचं निधन झाल्याचं ‘लुकोईल’ने एका निवेदनात म्हटलं आहे.
युद्धादरम्यान युक्रेनमध्ये घडणाऱ्या भयानक घटनांबाबत ३ मार्चला लुकोईल तेल कंपनीने दु:ख व्यक्त केले होते. वाटाघाटींद्वारे हे युद्ध लवकरात लवकर संपुष्टात आणण्याचं आवाहन देखील या तेल कंपनीकडून करण्यात आलं होतं. लुकोईल कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांकडून मॅगनोव यांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. ‘रायटर्स’ या वृत्तसंस्थेसह रशियन माध्यमांनी मॅगनोव यांच्या मृत्यूबाबतचं वृत्त दिलं आहे.
दरम्यान, मॅगनोव यांनी आत्महत्या केल्याचंही बोललं जात आहे. मात्र, याबाबत घटनास्थळी कुठलाही पुरावा किंवा दस्तावेज आढळला नाही, असा दावा ‘लुकोईल’ कंपनीशी संबंधित सूत्रांनी केला आहे. मॅगनोव आत्महत्या करणाऱ्यातील नाही, असे त्यांच्या काही निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यां मेरी रॉय यांचे निधन
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अनेक मोठ्या आसामींचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मॅगनोव त्यापैकीच एक आहेत. गेल्या मे महिन्यात ‘लुकोईल’ कंपनीचे माजी व्यवस्थापक अलेक्झांडर सुब्बोटीन त्यांच्या घराच्या तळघरात मृतावस्थेत आढळले होते. रशियाच्या ऊर्जा क्षेत्राशी निगडीत उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा देखील काही महिन्यांत संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.