लोकसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी भाजपा खासदाराने चक्क मद्याच्या बाटल्या वाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे याला महसूल तसेच पोलीस विभागाने परवानगी दिल्याची माहिती आहे. यासंदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा – ऑफ रोड ड्रायव्हिंग करणाऱ्या चालकाला पाहून आनंद महिंद्रांनी शेअर केला ‘तो’ VIDEO; म्हणाले, ‘रस्ता कितीही…’
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकचे चिक्कबल्लापूरचे भाजपा खासदार के. सुधाकर यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी मद्याचे वाटप केले आहे. एएनआयने यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओत मद्याच्या बाटल्या घेण्यासाठी मतदारसंघातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून येत आहे. तसेच नागरीक रांगेत उभे राहून मद्याच्या बाटल्या घेत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला महसूल विभागानेही परवानगी दिल्याची माहिती आहे. यासंदर्भात बोलताना, बंगळूरू ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सी.के.बोस म्हणाले, यात पोलीस विभागाची कोणतीही भू्मिका नाही. अशाप्रकारे मद्यवाटपाला महसूल विभागाने परवानगी दिली आहे. ही पूर्णपणे महसूल विभागाची जबाबदारी आहे. पोलिसांना याठिकाणी केवळ सुरक्षेच्या दृष्टीने तैन्यात करण्यात आलं आहे.
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे खासदार के. सुधाकर यांनी चिक्कबल्लापूर लोकसभा मतदानसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार एमएस रक्षा रामैया यांचा जवळपास दीड लाख मतांनी पराभव केला. या निवडणुकीत के. सुधाकर यांना ८ लाख, २२ हजार ६१९ मते मिळाली, तर एमएस रक्षा रामैया यांना ६ लाख ५९ हजार १५९ मते मिळाली.