देशभरातील बालवैज्ञानिकांचा आविष्कार
फगवाडा : सौरऊर्जेवर चालणारे पीक काढणारे यंत्र, वापरलेल्या खाद्यतेलापासून साबण, अपंगांना मदत करणारा यंत्रमानव अशा बालवैज्ञानिकांच्या आविष्कारांनी भारतीय विज्ञान काँग्रेसमधील ‘किशोर वैज्ञानिक संमेलन’ सजले आहे. या संमेलनाचे उद्घाटन नोबेल विजेत्या संशोधकांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
देशभरातून कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रकल्प संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. शेतीच्या अवजारांपासून ते यंत्रमानवापर्यंत विविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी साकारले आहेत. आंध्र प्रदेश येथील विद्यार्थ्यांनी पिकांची काढणी करणारे यंत्र तयार केले आहे. हे यंत्र सौरऊर्जेवर चालते. छोटय़ा शेतांमध्ये काम करण्यासाठी किफायतशीर पर्याय विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. अपंग, रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण यांना मदत करणारा यंत्रमानव दिल्ली येथील विद्यार्थ्यांनी साकारला आहे. अपंगांना हवी ती वस्तू तो आणून देऊ शकेल. जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थिनीने वापरलेल्या खाद्यतेलापासून तयार केलेला साबण लक्षवेधी ठरला आहे. राजस्थानमधील विद्यार्थ्यांने नदी, तलाव स्वच्छ करणारी, रिमोटवरील नाव तयार केली आहे. जलपर्णी, पडलेल्या वस्तू, धातूच्या वस्तू ही नाव गोळा करू शकते.
ठाण्याच्या विद्यार्थ्यांची बाजी
ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची या प्रदर्शनात निवड झाली आहे. सॅनिटरी नॅपकिन्सपासून होणारा कचरा आणि प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक पॅड्स तयार केली आहेत. फ्लॅनेल, लोकर, कापड वापरून ही पॅड्स तयार करण्यात आली आहेत. येऊर भागातील महिलांना या विद्यार्थ्यांनी या पॅड्सचे वाटप केले आहे. इशान खडसे, अक्षी टकले या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प साकारला असून त्यांना शिक्षिका डॉ. उषावती शेट्टी यांनी मार्गदर्शन केले आहे.
भावी पिढय़ांसाठी विज्ञान पेटी
भविष्यातील पिढय़ांना सध्या वापरात असलेली उपकरणे, शोध यांची माहिती मिळावी यासाठी भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये विज्ञान पेटी तयार करून ती लव्हली युनिव्हर्सिटीच्या परिसरात पुरण्यात आली. शंभर वर्षांनी ही उपकरणे त्या वेळच्या पिढीला पाहता यावीत अशी यामागील संकल्पना आहे. नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांच्या हस्ते ही पेटी जमिनीत पुरण्यात आली. यात स्मार्टफोन, लॅपटॉप, व्हीआर हेडसेट, ड्रोन, अॅमेझॉन अॅलेक्सा, हवा शुद्ध करणारे फिल्टर, इंडक्शन कूकटॉप, एअर फ्लायर, बारावीची सध्याची पुस्तके, हार्ड डिस्क अशा सुमारे १०० वस्तूंचा समावेश आहे.