अंगणवाडीतील मुलांना पौष्टिक आहाराच्या नावाखाली जनावरांच्या दर्जाचे खाणे देण्यात येत असल्याची धक्कादायक कबुली खुद्द केंद्रीय अन्नप्रक्रिया खात्याच्या राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिली आहे. यापूर्वीही अनेक वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत सापडलेल्या साध्वींच्या या नव्या विधानामुळे सरकार पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. अंगणवाडीतील मुलांना सोयाबीनसारखे पौष्टिक पदार्थ आहारात मिळाले पाहिजेत, अशी गरजही त्यांनी व्यक्त केली. त्या शनिवारी इंदोर येथील एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी अन्नप्रक्रिया केंद्रांच्या अपुऱ्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची योग्य ती किंमत मिळत नसल्याचेही त्यांनी म्हटले.