नवी दिल्ली :विधिअग्राह्य (व्हॉइड) म्हणजेच कायद्याचा आधार नसलेल्या किंवा अग्राह्य होऊ शकणाऱ्या (व्हॉयडेबल) विवाहांमधून जन्म झालेली संतती ही औरसच असते असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. अशा संततींना हिंदू वारसा कायद्याअंतर्गत पालकांच्या स्वअर्जित मालमत्तांवर अधिकार सांगता येईल असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल २०११ च्या याचिकेवर देण्यात आला आहे. त्यामध्ये बिगर विवाह संबंधांतून होणाऱ्या संततींना हिंदू विवाह कायद्याअंतर्गत त्यांच्या पालकांच्या मालमत्तेवर हक्क सांगण्याचा अधिकार आहे का यावरून ही याचिका दाखल करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> तोंडावर लाथा मारत फरपटत नेलं, बाळ जमिनीवर पडलं तरीही आईला बेदम मारहाण

निकालादरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, आम्ही दोन निष्कर्ष काढले आहेत. एक म्हणजे, अग्राह्य विवाहातून जन्माला आलेल्या मुलाला वैधतेचा दर्जा आहे आणि दुसरे, हिंदू विवाह कायद्याच्या कलम १६(२) अंतर्गत जिथे अग्राह्य होऊ शकणाऱ्या विवाह रद्द केला जातो तिथे विवाहशून्यतेच्या हुकुमनामा (डिक्री ऑफ नलिटी) वैध मानण्यापूर्वीच मूल जन्माला आल्यास ते वैध असेल. यामध्ये मुलगा आणि मुलगी यांचे अधिकार समान असतील. या मुलांना केवळ त्यांच्या पालकांच्या स्वअर्जित मालमत्तेवरच हक्क सांगता येईल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हिंदू कायद्यानुसार, अशा अग्राह्य विवाहातील स्त्री आणि पुरुषाला पत्नी आणि पतीचा दर्जा नसतो. मात्र, अग्राह्य होऊ शकणाऱ्या विवाहामध्ये त्यांना पती-पत्नीचा दर्जा असतो. अग्राह्य विवाहामध्ये विवाह रद्द करण्यासाठी कोणत्याही विवाहशून्यतेच्या हुकुमनाम्याची आवश्यकता नसते, तर अग्राह्य होऊ शकणाऱ्या विवाहामध्ये विवाहशून्यतेच्या हुकुमनाम्याची आवश्यकता असते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children of invalid marriages can claim in parents properties supreme court zws
Show comments