प्रशांत महासागराच्या तळाशी झालेल्या भूकंपामुळे सागरात उसळलेल्या सुनामी लाटांचा तडाखा चिलीच्या उत्तर किनारपट्टीला बसला. या धक्क्यात सहा जण मृत्युमुखी पडले तर वित्तहानीचीही नोंद झाली. सुनामी लाटांचा सर्वाधिक फटका इक्विक या शहराला बसला. किनारपट्टीवरील या शहराची लोकसंख्या नऊ लाख आहे. तब्बल दोन मिनिटे भूकंपाचा धक्का या शहराला जाणवत होता. येथील सर्व भाग संवेदनशील जाहीर करण्यात आला असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी चिली लष्कर सक्रिय झाले आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू चिलीच्या उत्तर किनारपट्टीपासून प्रशांत महासागराच्या तळाशी २३ किमी खोल होता. मात्र, या भूकंपामुळे समुद्रात दोन मीटर उंचीच्या सुनामी लाटा उसळल्या असून त्यांचा तडाखा किनारपट्टीवरील शहरांना बसला आहे. इक्विक या शहराचे सर्वाधिक नुकसान झाले. या आपत्तीत सहा जण मृत्युमुखी पडले. भूकंपाचे धक्के जाणवताच इक्विक शहरात घबराट उडाली. रस्त्यावरील दिवे गेल्याने शहर काळोखात बुडाले. लोकांनी इमारती रिकाम्या करून उंच भागाकडे धाव घेतली. दोन मिनिटे भूकंपाचा धक्का जाणवत होता. इक्विक हे चिलीमधील एक बंदर असून तेथे तांब्याच्या खाणी आहेत. गेल्या काही आठवडय़ांपासून तिथे विचित्र प्रकारचे धक्के बसत होते. हे बंदर राजधानी सँटियागोपासून १५०० कि.मी. दूर आहे. चिली सरकारने या किनारी भागातून लोकांना हलवले असून चिलीच्या अध्यक्ष मिशेल बॅशलेट यांनी तो भाग आपत्तीकारक जाहीर केला आहे. तेथे सन्य व पोलिसांची कुमक पाठवण्यात येणार असून दरडी कोसळलेले रस्तेही मोकळे केले जातील. सरकारने तेथील मदतकार्याचे कौतुक केले आहे. २०१०मध्ये मध्य दक्षिण चिलीत सुनामी लाटा उसळून ५२६ लोक मरण पावले होते. सरकारच्या मालकीच्या कोडेलको व इतर तांबे खाण कंपन्यांनी नुकसान झाले नसल्याचे सांगितले. उत्तर चिलीत तांब्याच्या खाणींचे काम सुरळित असून कोलाहुसी येथील खाणीत मात्र कामगारांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत बाहेर जाऊ देण्यात आले. मेक्सिकोचा पॅसिफिक किनारा तसेच मध्य व दक्षिण अमेरिकेलाही सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. हवाई बेटांनाही सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. सागरी जलाची पातळी उंचावल्याने सुनामी लाटा येत आहेत. पेरू देशात दक्षिण किनारपट्टीवरील लोकांना आयका भागातून सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. तेथील टॅकना, मोक्वेगुआ व अरेक्विरा शहरात वीजपुरवठा खंडित झाला आहे.

Story img Loader