Bengaluru Mahalaxmi Murder: बंगळुरूमध्ये सप्टेंबर महिन्यात महालक्ष्मी नावाच्या महिलेचा निर्घृण खून करण्यात आला होता. तिच्या शरीराचे अनेक तुकडे करून घरातील फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकरणी सुरुवातीला अनेक तर्क-वितर्क लढविले गेले. तिच्या पतीपासून ते प्रियकरापर्यंत संशय घेतला गेला. मात्र अखेर आरोपी हा तिसराच असल्याचे समोर आले. पोलिसांनी सांगितले की, महालक्ष्मी आणि तिचा प्रियकर मुक्तीरंजन रॉय हे त्यांच्या कार्यालयातील लोकांना शेवटचे १ सप्टेंबर रोजी एकत्र दिसले होते. त्यानंतर पंधरा दिवसांनी महालक्ष्मीच्या शेजाऱ्यांनी घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार दिली. २१ सप्टेंबर रोजी जेव्हा महालक्ष्मीचे आई-वडील तिच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांना तिचा मृतदेह फ्रिजमध्ये आढळून आला.

पोलिसांनी मुक्तीरंजन रॉयचा शोध घेण्यासाठी त्याच्या ओडिशामधील घरी धडक दिली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. मुक्तीरंजनने आत्महत्या करून स्वतःचेही जीवन संपवले. त्याच्या मृतदेहाच्या शेजारी पोलिसांनी सुसाईड नोट सापडली. ज्यातून दोघांचे प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली होती. याबरोबरच अनेक धक्कादायक खुलासे या पत्रात करण्यात आले होते.

हे वाचा >> Bengaluru Murder : “फ्रिजमध्ये माझ्या मुलीच्या मृतदेहाचे तुकडे पाहिले आणि…”, बंगळुरुत हत्या झालेल्या महालक्ष्मीच्या आईने काय सांगितलं?

सुसाईड नोटमध्ये काय म्हटले होते?

मुक्तीरंजनने सुसाईड नोटमध्ये लिहिले क, २ आणि ३ सप्टेंबरच्या रात्री त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यादरम्यान भांडणात त्याने गळा दाबून महालक्ष्मीची हत्या केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने बाजारात जाऊन धारधार शस्त्र विकत घेतले. या शस्त्राने त्याने महालक्ष्मीच्या मृतदेहाचे ५० तुकडे केले आणि ते फ्रिजमध्ये ठेवले. यानंतर त्याने घराची साफसफाई करून लहान भावासह ओडिशाला पळ काढला.

महालक्ष्मी मुक्तीरंजनचा खून करणार होती

मुक्तीरंजनने सुसाईड नोटमध्ये लिहिले की, महालक्ष्मी त्याचा खून करणार होती. यासाठी तिने घरात एक काळी सुटकेस आणून ठेवली होती. ज्यात त्याचा मृतदेह भरून न्यायचा होता. योगायोगाने पोलिसांना महालक्ष्मीच्या घरात काळी सुटकेस आढळून आली आहे. जी फ्रिजच्या शेजारीच ठेवली होती. “महालक्ष्मी माझ्या शरीराचे तुकडे करून त्या बॅगेत भरणार होती. जर मी तिला मारले नसते तर तिने माझा खून केला असता. माझ्याकडून स्वसंरक्षणार्थ तिचा खून झाला.

हे ही वाचा >> Mahalakshmi Murder Case : “महालक्ष्मीवर प्रेम होतं, पण तिने मला…”, बॉयफ्रेंडच्या सुसाइड नोटमध्ये काय लिहिलंय?

महालक्ष्मीकडून लग्नासाठी दबाव

सुसाईड नोटमध्ये पुढे लिहिले आहे की, महालक्ष्मीने मुक्तीरंजनच्या मागे लग्नाचा धोशा लावला होता. तसेच तिच्या मागण्या मान्य न केल्यास ती मारतही होती. महालक्ष्मीला सोन्याची चैन आणि सात लाख रुपये रोख देऊनही तिने माझा छळ केला.