Nepal Plane Crash : नेपाळच्या काठमांडूमधील त्रिभूवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी सुर्या एअरलाईन्सचे विमान कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला. हे विमान कोसळतानाचे अनेक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अतिशय थरकाप उडविणारे हे दृश्य आहे. काठमांडू येथून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच विमान कोसळले. ज्यामुळे धुराचे लोळ उठले. या विमानात १७ तंत्रज्ञ आणि दोन क्रू सदस्य होते. पोखरा शहरात एका दुसऱ्या विमानामध्ये दुरूस्ती करण्यासाठी हे विमान जात होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विमान कोसळल्यानंतर विमानाचा वैमानिक कॅप्टन मनीष शाक्य फक्त बचावला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्रिभूवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते तेज बहादुर पौड्याल यांनी सांगितले. विमान कोसळता क्षणीच तिथे उडालेला आगीचा भडका शविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अपघातग्रस्त झालेल्या विमानाच्या ठिकाणाहून काळ्या धुराचे लोट उठले होते.

सकाळी ११ वाजता त्रिभुवन विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतले होते. मात्र काही क्षणातच ९एन-एएमइ हे विमान कोसळल्याचे दिसले. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी काठमांडू पोस्टशी बोलताना सांगितले की, विमानाने धावपट्टीच्या दक्षिणेकडून उड्डाण घेतले होते. अचानक त्याला धक्का बसला आणि आग लागली. यानंतर ते पूर्वेकडील बुद्ध एअर हँगर आणि रडार स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या एका खड्ड्यामध्ये कोसळले.

मागच्या १४ वर्षांत १२ विमान अपघात

नेपाळमध्ये दरवर्षी सरासरीएक विमान अपघात होतो, असे काही माध्यमांच्या वृत्तामधून माहिती समोर येत आहे. २०१० पासून आतापर्यंत १२ विमाने नेपाळमध्ये कोसळली आहेत. १४ जानेवारी २०२३ रोजी काठमांडूपासून २०५ किमी अंतरावर पोखरामध्ये यती एअरलाइन्सचे विमान कोसळले होते. या विमानात ६८ प्रवासी आणि चार क्रू सदस्य होते.

हवाई वाहतूक क्षेत्रात असुरक्षा बाळगल्याबद्दल नेपाळवर अनेकदा टीका झालेली आहे. २००० सालापासून विमान अपघातात आतापर्यंत ३५० लोक मृत्यूमुखी पडले आहेत. १९९२ साली नेपाळमध्ये सर्वात मोठा विमान अपघात घडला होता. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरबस काठमांडू लगत असलेल्या टेकडीला धडकून कोसळले होते. ज्यामध्ये १६७ लोकांचा मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chilling video shows the moment saurya airlines plane crashed at kathmandu airport in nepal kvg