एकीकडे मैत्रीसाठी हात पुढे करायचा आणि दुसरीकडे विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसायचा, हे चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे खलनायकी परराष्ट्रीय धोरण आहे. हे दोन्ही घातक देश शेजारी म्हणून लाभले हे भारताचे मोठेच भौगोलिक दुर्दैव आहे. कपटनीती हा या दोन्ही देशांचा समान धागा आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक भारताला डिवचण्यासाठी मुद्दाम घुसखोरी करतात आणि भारतीय सैनिकांनी विरोध केल्यानंतर माघारी फिरतात. जम्मू-कश्मीरला लागून असलेली पाकिस्तानची सीमा पाकडय़ांनी जशी कायम अशांत ठेवली, त्याच पद्धतीने चिन्यांनीही भारतीय सैन्याला सीमेवर कायम ‘व्यस्त’ ठेवण्याचे धोरण स्वीकारलेले दिसते. गेल्या चारेक वर्षांमध्ये तर लडाख आणि अरुणाचल या दोन्ही बाजूंनी चिनी सैनिकांनी असंख्य वेळा घुसखोरी केली आहे. शांततेचा जप करत तणाव वाढविण्याचे या शेजारील देशाचे इरादे ओळखून भारताने सीमा मजबूत करतानाच नवी रणनीती आखायला हवी असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी सामनातून मोदी यांना दिला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखात उद्धव ठाकरे यांनी चीन आणि पाकिस्तान यांच्या कपटनीतीचा चांगलाच समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पुढील येणाऱ्या मोठ्या धोक्यापासून आताच सावध राहण्याचा इशाराही मोदी सरकारला दिला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुढील महिन्यात अर्जेंटिना येथे बैठक होणार आहे. चीनचे हिंदुस्थानातील राजदूत लुओ च्यहुई राजधानी दिल्लीत प्रसारमाध्यमांना नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मोदी-जिनपिंग भेटीची माहिती देत असतानाच चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशात पुन्हा घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असाच हा प्रकार आहे. ७३ दिवस चाललेल्या डोकलामच्या वादानंतर चीनने संरक्षण दलांवरील खर्चात भारताच्याच्या तुलनेत चारपटीने वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला अडचणीत आणण्याची एकही संधी चीन सोडत नाही. एकीकडे मैत्रीचा हात आणि दुसरीकडे घात, ही पाकिस्तानी नीती आता चीननेही अवलंबली आहे. शांततेचा जप करत तणाव वाढविण्याचे या शेजारील देशाचे इरादे ओळखून भारताने सीमा मजबूत करतानाच नवी रणनीती आखायला हवी असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी मोदी यांना दिला आहे.

Story img Loader