एपी, इस्लामाबाद
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील चीनच्या मालकीच्या एका हॉटेलवर ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी संघटनेने सोमवारी केलेल्या हल्ल्यानंतर चीनने या देशातील आपल्या नागरिकांना अफगाणिस्तान लवकरात लवकर सोडण्याची सूचना केली आहे.अफगाणिस्तानच्या तालिबान शासकांसाठी चीनची ही भूमिका धक्कादायक ठरणार आहे. अफगाणिस्तानाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी तालिबान सरकारला विदेशी गुंतवणुकीची निकडीची गरज असताना चीनने हे पाऊल उचलले आहे. या हल्ल्यात तीन हल्लेखोरांसह पाच जण ठार झाल्याचे समजते.
तालिबानचा प्रमुख प्रतिस्पर्धी ‘इस्लामिक स्टेट’ या संघटनेने सोमवारी काबूलच्या लाँगन हॉटेलवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्यात तीन हल्लेखोर व इमारतीच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या किमान दोन विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला.चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी या हल्ल्याचे वर्णन ‘भीषण’ असे केले. या हल्ल्यामुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. चीनने या घटनेची तपशीलवार चौकशी करण्याची मागणी करून चिनी नागरिक, संस्था, परियोजनांच्या सुरक्षेसाठी तालिबान सरकारला योग्य ती पावले उचलण्यास सांगितले आहे. काबूलमधील चिनी दूतावासाने या हल्ल्याची झळ पोहोचलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी एक पथक पाठवल्याचे सांगितले.