ज्वालामुखी प्रक्रियेवर नवा प्रकाश शक्य
सध्या चंद्रावर असलेल्या चीनच्या युटू या रोव्हर गाडीला तेथे नवीन प्रकारचा खडक सापडला आहे. अपोलो व ल्युना यानांच्या मोहिमेत आणण्यात आलेल्या खडकांपेक्षा तो वेगळा आहे. चंद्रावरील ज्वालामुखीच्या प्रक्रियेवर त्यामुळे नवा प्रकाश पडू शकेल. २०१३ मध्ये चीनची ‘चेंज ३’ ही मोहीम राबवण्यात आली होती. त्यात चंद्राच्या इमब्रियम खोऱ्यात युटू ही रोव्हर गाडी उतरवण्यात आली. ते खोरे ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून बनलेले आहे.
चेंज ३ मोहिमेतील रोव्हर गाडीला मिळालेले खडक हे अपोलो व ल्युना मोहिमात सापडलेल्या खडकांपेक्षा वेगळे आहेत. या विविधतेमुळे चंद्राच्या कवचाची रचना एकसमान द्रव्यांनी झालेली नसून त्यात विविधता आहे हे दिसून येत असल्याचे मत वॉशिंग्टन विद्यापीठाचे ब्रॅडले जॉलिफ यांनी व्यक्त केले आहे. रासायनिक विश्लेषणाचा वापर करून या खडकांच्या मदतीने आपण चंद्रावरील ज्वालामुखी प्रक्रियेचा अभ्यास करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या अपोलो (१९६९-१९७२) व रशियाच्या ल्युना (१९७०-१९७६) मोहिमांमध्ये तेथील बेसॉल्टचे तुकडे आणण्यात आले असून त्यापेक्षा आताचे खडकाचे तुकडे वेगळे आहेत. अपोलो व ल्युना मोहिमातील खडक हे ३ ते ४ अब्ज वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखी प्रक्रियेतील होते. ज्या खोऱ्यात चीनची रोव्हर गाडी उतरली आहे ते ३ लाख वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखी प्रक्रियेने बनलेले असून तुलनेने अलीकडचे आहे. अपोलो व ल्युना मोहिमांनी आणलेल्या दगडात टिटॅनियम कमी-जास्त प्रमाणात होते. युटू रोव्हर गाडीला सापडलेल्या खडकांचे क्ष किरण वर्णपंक्तीमापीने निरीक्षण केले असता त्यात टिटॅनियम व लोह सापडले आहे, असे चीनच्या शाँगडाँग विद्यापीठाचे झोंगचेंग लिंग यांनी म्हटले आहे. चंद्रावरील ज्वालामुखी प्रक्रिया समजून घेण्यासाठई टिटॅनियम ऑक्साईड महत्त्वाचे असून त्याचे प्रमाण १ ते १५ टक्के आहे.टिटॅनियम ऑक्साईडचे रूपांतर तेथे इलनेनाइटमध्ये होते, जे अगदी शेवटच्या टप्प्यातही स्फटिकाच्या रूपात जात नाही. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले
आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा