रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय दावेदार ट्रम्प यांची टीका
ओबामा प्रशासनाचे चीन धोरण कुचकामी होते, त्यामुळे अमेरिकेच्या पैशावर चीनची पुनर्बाधणी झाली व यात अमेरिका लुटली गेली, अशी खरमरीत टीका अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय शर्यतीतील प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
इंडियाना सिटी येथे समर्थकांपुढे बोलताना त्यांनी सांगितले की, चीनने अमेरिकेला लुटले, तुम्हाला ते माहिती आहे. आपण त्यांना १.८ महापद्म डॉलर्स लुटू दिले, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. चीनकडे बघा, आपण त्यांची पुनर्बाधणी केली आहे. त्यांनी अमेरिकेतून पैसा लुटला त्यावर ते उभे आहेत. अमेरिका-चीन व्यापारी तूट बघा, ती वर्षांला ५०० अब्ज डॉलर्स आहे. हा सगळा प्रकार मूर्खपणातून झाला की कुणाचे हितसंबंध होते हे माहिती नाही. मी अध्यक्ष झालो तर नोकऱ्या अमेरिकेत परत आणीन. चीनला अमेरिकेविषयी आदर नाही. ते आपल्याला शून्य किंमत देतात. चिनी लोक एकेकटय़ाने येत नाहीत, वीस किंवा जास्त संख्येने येतात, त्यांचा बुद्धयांक १८० च्या आसपास असतो. एक अपयशी ठरला तर दुसरा तयार असतो. २००१ मध्ये इंडियानात उत्पादन क्षेत्रातील चार पैकी एक रोजगार गेला. त्यावर्षी अमेरिकी काँग्रेसनेच जागतिक व्यापार संघटनेत चीनला आणले. ती मोठी चूक होती, असेही ते म्हणाले.
पाकिस्तान अमेरिकेची वसाहत नव्हे – गृहमंत्री खान
इस्लामाबाद : ओसामा बिन लादेनला ठार करण्यात मदत करणारे पाकिस्तानी डॉक्टर शकील आफ्रिदी यांची दोन मिनिटांत तुरुंगातून सुटका करण्याच्या विधानाबाबत अमेरिकन अध्यक्षपदासाठीचे प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचा रोष ओढवून घेतला आहे. पाकिस्तान ही अमेरिकेची वसाहत नाही, असे प्रत्युत्तर पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी दिले.