पूर्व लडाखमधील पॅंगॉन्ग त्सो तलावाभोवती चीन दुसरा मोठा पूल बांधत असल्याचं समोर आलंय. हा भाग चीनच्या ताब्यात आहे. सॅटेलाइट फोटोंवरून ही बाब उघडकीस आली आहे. तसेच या पुलाचा वापर चीन त्यांचं सैन्य कमी वेळेत त्या भागात जमवण्यासाठी करू शकते, असं या फोटोंवरून दिसतंय. दोन वर्षापूर्वी याच भागात चीन आणि भारतीय सैन्यात संघर्ष झाला होता. तेव्हापासून दोन्ही देशांत तणावाचं वातावरण कायम आहे, अशातच चीनने हा पूल बांधला आहे.
संशोधक डेमियन सायमन हे LAC वर चिनी हालचालींवर लक्ष ठेवतात. त्यांनी ट्विटरवर चीनच्या नवीन पुलाच्या बांधकामाचा सॅटेलाईट फोटो पोस्ट केलाय. सायमन म्हणाले की, ‘पहिल्या पुलाएवढाच एक मोठा पूल चीनकडून बांधला जात आहे. या तलावावर लष्करी हालचालींना समर्थन देणं आणि वेग वाढवणं, हे चीनच्या बांधकामाचं उद्दिष्ट असल्याचं दिसतंय.’
सायमन यांनी पोस्ट केलेल्या फोटोत तलावावर दोन्ही कडून पुलाचं बांधकाम सुरू असल्याचं दिसतंय. या पुलामुळे तलाव सहज पार करता येऊ शकतं.
या पुलाच्या नवीन बांधकामावर भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा टिप्पणी करण्यात आलेली नाही. भारतीय सैन्याने ऑगस्ट २०२० मध्ये पॅंगॉन्ग सरोवराच्या दक्षिणेकडील अनेक मोक्याची ठिकाणं काबीज केल्यानंतर चिनी पीएलएने या भागात त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून चीन या भागात आपल्या लष्करी पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देत आहे.
भारत देखील लष्करी तयारी वाढवण्याच्या एकूण प्रयत्नांचा एक भाग म्हणून सीमावर्ती भागात पूल, रस्ते आणि बोगदे बांधत आहे. चीनने या भागातील पहिल्या पुलाचे बांधकाम नुकतेच पूर्ण केल्याचं कळतंय. तसेच चीनने बांधलेला नवीन पूल LAC पासून २० किमी अंतरावर असलेल्या भागात बांधला जात आहे, असं या भागातील स्थानिक जाणकारांनी सांगितल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलंय.