बीजिंग : भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा वाढलेला तणाव कमी होण्यासाठी, पहलगाम हल्ल्याच्या जलद आणि निष्पक्ष चौकशीसह सर्व उपाययोजनांचे आपण स्वागत करतो असे चीनने सोमवारी सांगितले. पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चीनने प्रथमच अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यापूर्वी चीनने २३ एप्रिलला हल्ल्याचा निषेध केला होता. मात्र, दोन्ही देशांदरम्यान वाढत्या तणावावर त्यांनी प्रथमच भाष्य केले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडींसंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र हल्ल्याच्या तपासामध्ये पाकिस्तानने कथित मागणी केल्याप्रमाणे चीन सहभागी होईल का या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले. तसेच तपासाची निष्पक्षता आणि विश्वासार्हता याबद्दल कोणतीही टिप्पणी करण्याचे जियाकुन यांनी टाळले. पाकिस्तानचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेच्या संरक्षणासाठी पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानकडून पूंछ, कुपवाडामध्ये गोळीबार

जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ आणि कुपवाडा जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी सैन्याने रविवारी सलग चौथ्या रात्री पूंछ, कुपवाडा जिल्ह्यांमध्ये नियंत्रणरेषेवर गोळीबार करत शस्त्रविरामाचे उल्लंघन केले अशी माहिती सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. पाकिस्तानकडून हलक्या शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला असे संरक्षण विभागाने सांगितले.

पाकिस्तानच्या १६ यूट्यूब वाहिन्यांवर बंदी

नवी दिल्ली : भारताविरोधात सातत्याने खोटा, प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील कार्यक्रम सादर केल्याचा आरोप करत केंद्र सरकारने १६ पाकिस्तानी यूट्यूब वाहिन्यांवर बंदी घातली. तसेच पहलगाम हल्ल्याचे दहशतवाद्यांचा उल्लेख अतिरेकी असा करणाऱ्या बीबीसीच्या वार्तांकनालाही तीव्र आक्षेप घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. केंद्रीय गृह विभागाच्या सूचनेनंतर ही बंदी घालण्यात आली आहे.

भारत आणि पाकिस्तानचा शेजारी देश म्हणून चीनची आशा आहे की, दोन्ही देश संयम बाळगतील, चर्चा करण्यासाठी दोघेही पुढे येतील, चर्चा आणि सल्लामसलतीच्या माध्यमातून संबंधित मतभेद योग्यपणे हाताळतील आणि दोघेही प्रादेशिक शांतता व स्थैर्य कायम राखतील.– गुओ जियाकुन, प्रवक्ते, चीनचे परराष्ट्र मंत्रालय