वृत्तसंस्था, बीजिंग
अरूणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांना चिनी नावे देण्यास भारताने तीव्र आक्षेप घेतल्यानंतरही हा भाग म्हणजे दक्षिण तिबेट असून तो आपल्या देशाचे अविभाज्य अंग असल्याचा हेका चीनने कायम ठेवला आहे.चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने अलिकडेच अरुणाचल प्रदेशमधील आणखी ११ ठिकाणांना चिनी नावे दिल्याचे समोर आल्यानंतर भारताने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असून, कपोलकल्पित नावांमुळे वास्तव बदलू शकत नाही, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अिरदम बागची यांनी मंगळवारी चीनला ठणकावले होते. याला उत्तर देताना चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले, की ‘झांगनान’ (अरूणाचल प्रदेशला चीनने दिलेले नाव) हा चीनचा भाग आहे. त्यामुळे चीनच्या सक्षम प्राधिकरणाने या भागातील नावांचे प्रमाणिकरण केले असून तो चीनचा सार्वभौम हक्क आहे.
अरुणाचल प्रदेशच्या चीनने प्रमाणित केलेल्या भौगोलिक नावांची यादी जाहीर करण्याची ही तिसरी वेळ आहे. सहा ठिकाणांच्या चीनने प्रमाणित केलेल्या नावांची पहिली यादी २०१७ मध्ये, तर १५ ठिकाणांची दुसरी यादी २०२१ मध्ये प्रसृत करण्यात आली होती.अमेरिकेचा भारताला पाठिंबा अरूणाचल प्रदेश हे राज्य भारताचा भाग असून त्यामध्ये एकतर्फी बदलास तीव्र विरोध असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. ‘प्रदीर्घ काळापासून तो भाग (अरुणाचल प्रदेश) भारतात आहे. स्थळांची नावे बदलून कुणी आपला भूप्रदेश वाढविण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला आमचा विरोध राहील आणि हीच आमची दीर्घकाळापासून भूमिका राहिली आहे, असे व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव करीन जिन-पेरी यांनी म्हटले आहे.