बीजिंग : चीनचा अरुणाचल प्रदेशवरील दावा ‘मूर्खपणाचा’ व ‘हास्यास्पद’ असल्याचे सांगून भारताने तो फेटाळला असला, तरी अरुणाचल प्रदेश हा आपल्या भूप्रदेशाचा भाग असल्याचा आपला दावा चीनने सोमवारी कायम राखला. चीन अरुणाचल प्रदेशवर वारंवार करत असलेला दावा ‘हास्यास्पद’ असल्याचे, तसेच हे सीमावर्ती राज्य ‘भारताचा नैसर्गिक भाग’ असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी ठासून सांगितले होते. तरीही, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जिआन यांनी चीनच्या दाव्याचा पुनरुच्चार केला.
‘हा नवा मुद्दा नाही. चीनने आपला दावा कायम राखला आहे व त्याचा विस्तार केला आहे. हे दावे मुळातच हास्यास्पद असून आजही तितकेच हास्यास्पद आहेत’, असे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या प्रतिष्ठित अशा इन्स्टिटय़ूट ऑफ साऊथ एशियन स्टडीज (आयएसएएस) मध्ये व्याख्यान दिल्यानंतर अरुणाचल प्रदेशाबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले होते.
हेही वाचा >>> Holi 2024 : देशामध्ये होळीचा रंगीत हर्षोल्हास
जयशंकर यांच्या या वक्तव्याबाबत अधिकृत माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, भारत व चीन यांच्यातील सीमा कधीही निश्चित करण्यात आलेली नसल्याचे लिन एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. अरुणाचल प्रदेशसाठी चीनचे अधिकृत नाव असलेला ‘झांग्नान’वर भारताने ‘बेकायदेशीररित्या ताबा मिळवेपर्यंत’ तो नेहमीच चीनचा भाग होता, असा दावा त्यांनी केला. चीनचे या भागात पूर्वापार परिणामकारक प्रशासन राहिलेले असल्याचेही त्यांनी सांगितले.
बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेल्या भूप्रदेशावर भारताने १९८७ साली ‘तथाकथित अरुणाचल प्रदेश’ स्थापित केला ही ‘निर्विवाद वस्तुस्थिती’ असल्याचाही दावा लिन यांनी केला. ‘भारताच्या कारवायांबाबत आम्ही कडक शब्दांत वक्तव्ये जारी केली असून त्यांच्या कृती अप्रभावी असल्याचे सांगितले आहे आणि चीनची ही भूमिका कधीही बदललेली नाही’, असे लिन म्हणाले. चीनने अरुणाचल प्रदेशावरील त्याच्या दाव्याबाबत विधान केल्याची या महिन्यातील ही चवथी वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ मार्चच्या अरुणाचल भेटीबाबत आपण भारताकडे राजनैतिक निषेध नोंदवला असून, या प्रदेशावर आपल्या दाव्याचा पुनरुच्चार केला असल्याचे चीनने सांगितले आहे.