चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाचा उद्रेक होत असून स्थिती गंभीर होत आहे. केंद्र सरकारनेही याची दखल घेतली असून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. केंद्राने करोना विषाणुतील नव्या उत्परिवर्तनाची माहिती मिळवण्यासाठी दैनंदिन करोना चाचण्यांत आढळलेल्या नमुन्यांचे संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याची सूचना सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. यादरम्यान सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी लोकांना घाबरु नका असं आवाहन केलं आहे.
आपण केलेलं लसीकरण आणि ट्रॅक रेकॉर्ड पाहता घाबरण्याची गरज नाही असं अदर पूनावाला म्हणाले आहेत. याचवेळी त्यांनी लोकांना केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाच्या नियमांचं पालन करण्याचंही आवाहन केलं आहे.
“चीनमधून येणारी करोना रुग्णांसंबंधीची बातमी चिंताजनक आहे. पण आपण केलेलं लसीकरण आणि ट्रॅक रेकॉर्ड पाहता घाबरण्याची गरज नाही. केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने आखून दिलेल्या नियमावलीवर विश्वास ठेवत आपण तिचं पालन करत राहायला हवं,” असं ट्वीट अदर पूनावाला यांनी केलं आहे.
चीनमधील करोनाच्या उद्रेकामुळे भारत सावध
चीनसह जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत करोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर दैनंदिन करोना चाचण्यांत आढळलेल्या नमुन्यांचे संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याची सूचना सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने मंगळवारी केली.
याबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की असे र्सवकष जनुकीय क्रमनिर्धारण केल्यास देशात उत्परिवर्तित करोना विषाणूंच्या नवीन प्रकारांचा वेळेवर मागोवा व शोध घेणे शक्य होईल. सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी विषाणूचा प्रतिबंध करणे आवश्यक असून त्यासाठी उपाययोजना करणे सोपे जाईल. या पत्रात भूषण यांनी अधोरेखित केले, की विषाणू चाचणी, करोना प्रकरणांचा मागोवा, उपचार, लसीकरण व कोविड प्रतिबंधक वर्तन या पाच स्तरांवर धोरणात भर देण्यात येणार आहे. देशात सध्या आठवडाभरात १२०० रुग्ण आढळत आहेत. अजूनही जगभरात कोविड-१९ चे आव्हान कायम आहे. कारण जगभरात अजूनही ३५ लाख रुग्णांची दर आठवडय़ाला नोंद होत आहे.