दक्षिण चिनी समुद्रातील कारवायांचेही समर्थन; जपान, अमेरिकेलाही इशारा
भारतीय नौदलातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनामध्ये (आयएफआर) चीनने रविवारी आपली दादागिरी दाखवून दिली. गेल्या काही वर्षांत वादग्रस्त ठरलेल्या दक्षिण चिनी समुद्राच्या टापूतील आपल्या कारवायांचे चीनने जोरदार समर्थन केले. व्हिएतनाम, फिलिपाइन्स यांना आपण मानतच नाही, असे सांगून जपानने आगळीक करण्याचा प्रयत्न केल्यास पूर्वेकडील भागात त्यांची कोंडी करू, असा धमकीवजा इशाराही त्यांना दिला. अमेरिका आम्हाला टक्कर देऊ शकते, पण आमच्या भागात त्यांचे फारसे काही चालणार नाही, अशी दर्पोक्तीही चीनने केली आहे.
आयएफआरच्या आयोजनाचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संरक्षणमंत्री मनोहर पíरकर यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर लगेचच परिषदेला सुरुवात झाली. बीजिंग येथील चायनीज अकादमी ऑफ सोशल सायन्सेसमधील प्रा. ये हैलीन यांच्या माध्यमातून परिषदेत चीनची भूमिका मांडण्यात आली. प्रा. ये आजारपणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी पाठविलेला शोधनिबंध वाचून दाखविण्यात आला. दक्षिण चिनी समुद्र हा आपल्याच अखत्यारीतील भाग असल्याचा मुद्दा चीनने पुन्हा एकदा जोरदार रेटला. येथे असेलेले फिलिपाइन्स आणि व्हिएतनामसारखे लहान देश आपल्याशी टक्कर देण्याची क्षमता राखत नाहीत. फिलिपाइन्सच्या हद्दीत आतपर्यंत जाऊन आल्यानंतरही ते काहीच करू शकले नाहीत, त्यांना तर स्वत:चा किनाराही राखता येत नाही, ते आम्हाला काय करणार? व्हिएतनाम आणि फिलिपाइन्ससारखे देश त्यांची तक्रार भारत किंवा जपानकडे मांडण्याशिवाय दुसरे काही करूच शकत नाही, असे ही भूमिका मांडताना सांगण्यात आले. आम्हाला टक्कर देण्याची क्षमता एकटय़ा अमेरिकेकडे आहे. मात्र आमच्या क्षेत्रात त्यांचे फारसे काही चालणार नाही, अशी दर्पोक्ती करून चीनच्या वतीने जपानला धमकीवजा इशाराच देण्यात आला. दक्षिण चिनी समुद्रामध्ये आगळीक करण्याचा प्रयत्न केलात तर पूर्वेकडील भागात आम्ही तुम्हाला पाहून घेऊ, अशा शब्दांत जपानला सुनावण्यात आले. व्हिएतनाम, फिलिपाइन्स आणि जपानचे प्रतिनिधीही या परिषदेस हजर होते. चीनच्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास त्या सर्वानीच नकार दिला.

परिषदेचा नूर पालटला
चीनने घेतलेली ही आक्रमक भूमिका सर्व उपस्थितांना अचंबित करून गेली. या भूमिकेमुळेच नंतर परिषदेचा नूरही पालटला. बहुतांश चर्चा चीन व भारत संघर्ष आणि दक्षिण चिनी समुद्रातील वाद याभोवतीच फिरत राहिली. युद्ध कुणालाच परवडणारे नसले तरी चीन आणि भारत यांच्यामध्ये संघर्षांची ठिणगी पडू शकते, तशी सर्वाधिक शक्यता दिसते आहे, अशी भीती दक्षिण आफ्रिकेतील संरक्षण तज्ज्ञ प्रा. रेनफ्रय़ू ख्रिस्ती यांनी व्यक्त केली. त्यानंतर संपूर्ण परिषदेमध्ये दक्षिण चिनी समुद्रातील वादावरच चर्चा झडत राहिली.

Story img Loader