चीनच्या बहुतांश शहरांमधील सरकारी कार्यालयासमोर सध्या विवाहितांच्या रांगा लागल्या आहेत. या विवाहितांना झटपट घटस्फोट हवा आहे, मात्र त्यांच्यातील सर्व जण दुखाने नाही तर हसतमुखाने या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. याचे कारण अर्थातच चीन सरकारने मालमत्ता विक्रीसंबंधी जारी केलेल्या नव्या कायद्यात आहे.
चीन सरकारने गेल्या आठवडय़ात मालमत्ता विक्रीसंबंधी एक कायदा पारित केला असून त्यानुसार तेथील नागरिकांनी एखादी निवासी मालमत्ता विकली तर त्यातून होणाऱ्या नफ्यातील तब्बल २० टक्के रक्कम सरकारकडून कापून घेतली जाणार आहे. याच कायद्यानुसार पती-पत्नीच्या नावावर प्रत्येकी एक घर असेल आणि त्यांनी घटस्फोट घेतल्यानंतर ही मालमत्ता विकल्यास या करातून त्यांना सूट मिळणार आहे. याच पळवाटेचा आधार घेत चीनमधील अनेक जोडपी सध्या घटस्फोट घेत असून त्यानंतर आपली मालमत्ता विकताना दिसत आहेत.
विवाह नोंदणी कार्यालयातच घटस्फोटांचीही प्रक्रिया होत असल्याने सध्या या कार्यालयांसमोर अशा जोडप्यांच्या मोठय़ा रांगा दिसत आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये काही गरोदर महिलांचाही समावेश आहे. मालमत्ता विकल्यानंतर आम्ही पुनर्विवाह करणार असल्याचेही या महिला बिनदिक्कतपणे सांगत आहेत.

Story img Loader