चीनच्या अत्यंत दुर्गम अशा झिनजीआंग प्रांताला मंगळवारी सकाळी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. भूकंपानंतरही काही वेळ धक्के जाणवत होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ७.३ इतकी नोंदविली गेली.
झिनजीआंगच्या नैर्ऋत्येकडील युतियान परगण्यांत १२ कि.मी. अंतरावर सदर भूकंपाचा केंद्रबिंदू होता, असे चीनच्या भूकंपमापन केंद्राच्या वतीने सांगण्यात आले. या भूकंपामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही. या भूकंपाचे धक्के होतान, युतियान आणि मोयू क्षेत्रालाही जाणवले.
या परिसराला अल्पावधीत भूकंपाचे एकूण सात धक्के बसले. त्यापैकी ७.३ रिश्टर स्केल क्षमतेचा धक्का सर्वात मोठा होता. या परिसरात युग्यूर वांशिक मुस्लीम मोठय़ा संख्येने आहेत. चीनला सातत्याने भूकंपाचे जोरदार धक्के बसत असतात.