चीनमध्ये सोमवारी (१८ डिसेंबर) रात्री भीषण भूकंप झाला आहे. या भूकंपात जवळपास १११ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलीय. हा भूकंप वायव्य चीनच्या गान्सू आणि किंघाई प्रांतांमध्ये झाला. ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. रात्री ११.५९ वाजता क्षेत्रात भूकंप जाणवल्याचे चीन अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने सांगितले. तसंच, या भूकंपामुळे पायाभूत सुविधांचे गंभीर नुकसान झाले आहे. स्थानिक वृत्तसंस्थांच्या आधारे फायनान्शिअल एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू कुठे?
जिशिशान बओआनच्या काऊंट सीटपासून अंदाजे ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या गान्सूमधील लिनक्सिया हुई प्रांताच्या डोंग्झियांग आणि साला काऊंटी असलेल्या लिउगौ टाऊनशिपमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपामुळे घरे, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे, असं सरकारी शिन्हुआ वृत्तसंस्थेने सांगितले.
वीज आणि पाणीपुरवठा खंडित
चीनमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता अधिक होती. परिणामी येथील वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला आहे. तर, या भूकंपाचा परिणाम हवामानावरही जाणवण्याची शक्यता आहे. जिशिशनमधील किमान तापमान मंगळवारी उणे १० अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.
बचावकार्याला सुरुवात
स्थानिक अग्निशमन आणि बचाव विभागाने ८८ अग्निशमन इंजिन, १२ शोध आणि बचाव कुत्रे आणि १० हजारांहून अधिक उपकरणांसह ५८० बचावकर्ते भूकंप क्षेत्रात पाठवले आहेत. तसंच, भूकंप क्षेत्रातून जाणाऱ्या प्रवासी आणि मालवाहू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे रुळांची सुरक्षा तपासण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.