उत्तर अमेरिकेच्या अवकाशात असलेल्या चीनच्या कथित गूप्तहेर बलूनला अमेरिकेने नष्ट केल्यानंतर चीनने अमेरिकेचा निषेध केला आहे. अमेरिकेच्या हवाई हद्दीत सदर बलून दिसल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तो नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अमेरिकेच्या हवाई दलाने F-22 या हायटेक रॅप्टर एअरक्राफ्टच्या मदतीने चीनचा बलून नष्ट केला. या बलूनवर सिंगल साइडविंडर मिसाईल सोडलं गेलं. बलून फुटल्यानंतर त्याच्यामुळे कुणाचे नुकसान होऊ नये म्हणून या बलूनला दक्षिण कॅरोलिनाच्या अटलांटिक महासागरापर्यंत नेण्यात आले. तिथे बलूनवर मिसाइस सोडून त्याला नष्ट करण्यात आले.
चीनच्या परराष्ट्र खात्याने यावेळी तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले की, “अमेरिकेने शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवायला हवा होता, असे आम्हाला वाटत होते. मात्र अमेरिकेने आमच्या सिव्हिलियन एअरशिपला नष्ट केले. आम्ही या घटनेचा निषेध करतो. अमेरिकेने हे कृत्य करुन आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आहे. चीन स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. आमचे सिव्हिलियन एअरशिप चुकून अमेरिकेच्या हवाई हद्दीत आले होते. याबाबत अमेरिकेसोबत आम्ही अनेकदा चर्चा केलेली आहे. ही फक्त एक दुर्घटना होती. आमच्या बलूनमुळे अमेरिकेच्या सैन्यांना कोणताही धोका नव्हता.”
कथित गुप्तहेरी हेरगिरी करणाऱ्या चीनच्या बलूनला नष्ट केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “या बलूनविषयी मला माहिती मिळाली, त्यानंतर लगेच पेंटागॉनला हा बलून नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच हा बलून पाडत असताना कुणालाही नुकसान पोहोचणार नाही, याची काळजी घेण्याचेही आवाहन केले होते. त्यासाठीच या बलूनला दूर समुद्रात नेऊन पाडण्यात आले.”
जो बायडेन पुढे म्हणाले की, “या बलूनला नष्ट केल्यानंतर त्याचे अवशेष गोळा करण्यात येणार आहेत. यासाठी समुद्रात शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. सैन्यासोबत एफबीआयचे अधिकारी देखील आहेत. हे मिशन यशस्वी करण्यासाठी अमेरिकेकडून मानव विरहीत बोटींना देखील तैनात केले आहे.” तसेच पेंटागॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक दिवसांपासून आम्ही चीनच्या या बलूनवर लक्ष ठेवून होतो. २८ जानेवारी रोजी या बलूनने अलास्कामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ३० जानेवारी रोजी बलूनने कॅनडाच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला होता. ३१ जानेवारी रोजी या बलूनने पुन्हा एकदा कॅनाडाहून अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात प्रवास सुरु केला होता.
हे वाचा >> ‘बलून’ प्रकरणामुळे अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांचा चीन दौरा रद्द; हेरगिरीचा संशय
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांचा चीन दौरा रद्द
दरम्यान, शुक्रवारी चीनने अमेरिकेच्या हवाई हद्दीत आढळलेला हा बलून आमचाच आहे, असे स्पष्टीकरण दिले होते. तसेच या बलूनच्या माध्यमातून पर्यावरणविषयक संशोधनक करण्यात येत असून तो चुकून अमेरिकेच्या हद्दीत गेला, असेही चीनने सांगितले होते. या घटनेमुळे मात्र अमेरिका-चीन यांच्या राजकीय संबंधांत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी चीन दौरा रद्द केला आहे.