प्रेम आंधळं असं म्हणतात. प्रेमात पडताना धर्म, जात किंवा देशांच्या सिमा काहीच महत्वाचं नसतं असंही अनेकजण म्हणतात. असचं काहीस घडलं आहे ऋषिकेशमधील एका तरुणाबरोबर. गुरुवारी शहरातील गंगाघाटावर पार पडलेला एक अनोखा विवाहसोहळा चर्चेचा विषय ठरला आहे. या विवाह सोहळा होता शहरात योग अभ्यास वर्ग चालवणाऱ्या विमल पांडे आणि चीनमधील तरुणी लेन के यांचा. विशेष म्हणजे या दोघांनी भारतीय परंपरेनुसार लग्न केले. या दोघांचा विवाह जितका चर्चेचा विषय ठरला तितकीच रंजक त्यांची प्रेमकथा आहे.
चीनमधील शांघाय शहरातील असणारी लेन ही तिचे योगा शिक्षक असणाऱ्या विमलच्या प्रेमात पडली. झालं असं की मुळचा नेपळचा असणारा विमल हा आधी दिल्लीमध्ये रहायचा. नंतर योग शिकवण्यासाठी तो ऋषिकेशमध्ये स्थायिक झाला. मुनिकीरेती येथील योग निकेतन आश्रमात विमल योगा शिकवतो. साधारण अडीच वर्षांपूर्वी लेन ही योगा शिकण्यासाठी ऋषिकेशमधील निकेतन आश्रमात आली होती. तेव्हाच पहिल्यांदा या दोघांची भेट झाली आणि लेन विमलच्या प्रेमात पडली. योगा शिकून झाल्यानंतर लेन चीनमध्ये परत गेली. मात्र फोनवरून दोघे संपर्कात होते. याच दरम्यान दोघांनी एकमताने लग्न करण्याचा निर्णय घेतला. विमल आणि लेनने आपल्या कुटुंबाच्या परवाणगीने भारतीय पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला.
या लग्नासाठी विमलच्या घरच्यांबरोबरच चीनवरून वऱ्हाडच लीनच्या लग्नासाठी ऋषिकेशमध्ये दाखल झाले होते. यामध्ये लीनचे वडील हो शुंगनियन आणि आई लियू पिंग या दोघांबरोबरच चुलत भाऊही उपस्थित होते. दोघांच्याही आई-वडिलांनी नववधूवराला आशिर्वाद दिला.
लीनचे काही मित्रमैत्रिणीही या लग्नात उत्साहाने सहभागी झाले. सर्वच चीन पाहुण्यांनी भारतीय पद्धतीने झालेल्या या विवाहसोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला.