संरक्षणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेली संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) संगणकांतील माहिती हॅक झाल्याचे आढळले आहे. चिनी हॅकर्सनी संस्थेतील संगणक हॅक करून ही माहिती चोरल्याचा संशय आहे. 
गुप्तचर यंत्रणांकडून या हॅकिंगची तपासणी करण्यात येत असून, सध्यातरी जास्त काही सांगता येणार नाही, असे संरक्षणमंत्री ए. के. ऍंटनी यांनी पत्रकारांना सांगितले. डीआरडीओचे प्रवक्ते रवि गुप्ता यांनी संस्थेतील नेटवर्क हॅक झालेले नसून, कोणत्याही संगणकातील माहिती चोरीला गेल्याचे आढळलेले नाही, असे म्हटले आहे.
काही वर्षांपूर्वीही डीआरडीओचे संगणक हॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर हॅकिंग रोखण्यासाठी विविध उपाय योजण्यात आले होते. तरीही नव्याने हॅकिंगचा प्रकार समोर आल्याने संरक्षणतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केलीये.