चीनमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. चीनमध्ये गेल्या ६० वर्षांच्या तुलनेत यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. झेंग्झो शहरात वर्षभरात ६४०.८ मिमी पाऊस पडतो. मात्र यंदा एका दिवसात ६१७.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे झेंग्झो शहर पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. आतापर्यंत दोन लाख नागरिकांना सुरक्षित हलवण्यात आलं आहे. तर २५ जणांचा यात मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे चार ते पाच फुटापर्यंत पाणी रस्त्यावर भरलं आहे. तसेट पावसामुळे वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. रुग्णालयातील वीज गेल्याने त्याचा फटका रुग्णांना बसला आहे. त्याचबरोबर करोना काळातील आरोग्य व्यवस्थाही कोलमडून पडली आहे. रस्त्यांवर नद्या वाहत असल्याचं चित्र दिसत आहे. पूरस्थितीबाबत चीनच्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

“या वर्षी चीनमध्ये सहाव्या चक्रीवादळाचा फटका बसला आहे. चीनमधील हेनान प्रांतात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. चीनच्या झेंग्झो भागात सर्वाधिक पाऊस पडला आहे.” अशी माहिती ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत दिली आहे. शहरातील अनेक गाड्या पाण्याखाली गेल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

“जगभरात नैसर्गिक आपत्तीचा परिणाम जाणवत आहे. चीनमधील झेंग्झो शहरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. आठ महिन्यांचा पाऊस एका दिवसात पडला आहे”, असं ट्वीट यूएन क्लायमेट चेंज या अधिकृत ट्विटर खात्यावरून करण्यात आलं आहे.

पुढचे तीन दिवस हेनान भागात अतिवृष्टीचा इशारा चीनी हवामान खात्यानं दिला आहे. या इशाऱ्यानंतर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. तसेच लोकांच्या सुरक्षेसाठी सैनिकांना पाचारण करण्याचे आदेश दिले आहेत.

Story img Loader