भारतासोबतचे आमचे संबंध भविष्यातही चांगले रहातील आणि उभय देशांच्या सीमेवर शांतता नांदेल, असा आशावाद चीनने व्यक्त केला आहे. चीनचे वरिष्ठ लोकप्रतिनिधी यांग जेशी यांनी शुक्रवारी केपटाऊन येथे हे वक्तव्य केले. ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि द. आफ्रिका) देशांच्या परिषदेच्या पाश्र्वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मुद्दय़ांवर भारतासोबत यापुढेही आम्ही सहकार्य राखू, भविष्यात हे संबंध आणखी दृढ होतील, तसेच सीमेवर कायम शांतता नांदावी, यासाठी उभय देश कटिबद्ध असतील, असे ते म्हणाले. आशिया तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर असे अनेक मुद्दे आहेत, ज्यात भारत आणि चीनने समन्वय राखल्यास अनेक प्रश्न सुटू शकतील, त्या दृष्टीनेही भविष्यात काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. मेनन यांनी या वेळी यांग यांच्याशी सहमती दर्शवली. उभय देशांत अनेक बाबतीत देवाणघेवाण होऊ शकते, उभय देशांतील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होण्यासाठी आणखी बराच वाव आहे, असे मेनन म्हणाले.
यांग यांनी ब्रिक्स देशांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत पुढेही भाषण केले. ब्रिक्सच्या सर्व देशांनी परस्परांतील सहकार्य अधिक दृढ करायला हवे तसेच आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय स्तरावर शांतता व स्थैर्य नांदण्यासाठी उपाययोजना करायला हवी, सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे, असे ते म्हणाले.

Story img Loader