भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशवर चीनने पुन्हा एकदा दावा केला आहे. यावेळी चीनने नवा नकाशा जाहीर केला असून यामध्ये अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन, तैवान आणि दक्षिण चीन समुद्राचा बहुतांश भाग असल्याचं नकाशात दाखवलं आहे. एप्रिल महिन्यात चीनने अरुणाचल प्रदेशातील ११ गावांचं नामकरण केलं होतं. यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. आता नव्या नकाशात भारताचा भाग दाखवण्यात आल्याने पुन्हा एकदा सीमेवर वातावरण तापण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनच्या स्टॅण्डर्ड मॅप सर्व्हिस या संकेतस्थळावर नैसर्गिक संसाधन खात्याकडून चीनचा २०२३ चा अधिकृत नकाशा लॉन्च करण्यात आला, अशी माहिती चीनचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने ट्वीट केली आहे. हा नकाशा चीन आणि जगातील इतर देशांच्या सीमा रेखाटण्याच्या पद्धतीवर आधारीत आहे, असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. जाहीर झालेल्या नव्या नकाशानुसार अरुणाचल प्रदेश, दक्षिण तिबेट, अक्साई चीन, तैवान आणि दक्षिण सागरी भाग चीनचा भाग असल्याचं दाखवण्यात आले आहेत.

वादग्रस्त भागांवर दाखवला हक्क

अरुणाचल प्रदेश आणि अक्साई या दोन्ही क्षेत्रांबाबत चीन आणि भारतात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. अरुणाचल प्रदेशवर चीनने दावा केला असला तरीही अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे. भारताने या भूमिकेचा सातत्याने पुनरुच्चार केला आहे. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि कायमस्वरुपी राहणार आह, अशी भूमिका भारताने घेतली आहे.

हेही वाचा >> VIDOE : “फाळणीदरम्यान पाकिस्तानात का गेला नाहीत?” शिक्षिका भरवर्गात मुस्लीम विद्यार्थ्यांवर संतापली

अरुणाचल प्रदेश त्यांच्या नकाशात दाखवून चीनने भारताविरोधात षड्डू ठोकला असून तैवानबरोबरही तणाव निर्माण केला आहे. तर, चीनने दावा केलेल्या दक्षिण चीन समुद्री भागावर व्हिएतनाम, फिलिपाइन्स, मलेशिया, ब्रुनेइ या देशांचा हक्क आहे.

११ जागांचं केलं होतं नामकरण

याआधी चीनने एप्रिल २०२३ मध्ये आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशच्या ११ जागांचं नामकरण केलं होतं. गेल्या पाच वर्षांत चीनने असा प्रकार तीनवेळा केला आहे. याआधी २०२१ मध्ये चीनने १५ जागांचे तर, २०१७ मध्ये सहा जागांचं नामकरण केलं होतं.

अमेरिकेने दर्शवला होता पाठिंबा

एप्रिल महिन्यात चीनने अरुणाचल प्रदेशच्या ११ जागांचे नामकरण केले होते. तेव्हा अमेरिकेने भारताला पाठिंबा दर्शवला होता. “अरूणाचल प्रदेश हे राज्य भारताचा भाग असून त्यामध्ये एकतर्फी बदलास तीव्र विरोध असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. ‘प्रदीर्घ काळापासून तो भाग (अरुणाचल प्रदेश) भारतात आहे. स्थळांची नावे बदलून कुणी आपला भूप्रदेश वाढविण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला आमचा विरोध राहील आणि हीच आमची दीर्घकाळापासून भूमिका राहिली आहे”, असे व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव करीन जिन-पेरी यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China includes arunachal pradesh aksai chin in new standard map sgk
Show comments