पीटीआय, बीजिंग

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘जशास तशा’ करांची घोषणा केल्यानंतर चीनने प्रत्युत्तर देत शुक्रवारी अमेरिकी वस्तूंवर आणखी ३४ टक्के आयातशुल्क लादले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात मक्तेदारी असलेल्या काही दुर्मिळ संयुगांच्या अमेरिकेला निर्यातीवरही जिनपिंग प्रशासनाने निर्बंध आहेत. जगातील सर्वांत दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये छेडले गेलेले हे व्यापारयुद्ध अधिक गडद होण्याची शक्यता वाढल्याने याचा फटका जगाच्या अर्थकारणाला बसण्याची भीती आहे. गेल्याने त्याचा मोठा फटका बसण्याची भीती आहे.

चीनमधील सरकारी वृत्तसंस्था ‘शिनहुआ’ने दिलेल्या बातमीनुसार १० एप्रिलपासून अमेरिकेतील वस्तूंवर हे वाढीव आयातशुल्क लागू होईल. तसेच बाजारात मक्तेदारी असलेल्या दुर्मिळ संयुगांच्या निर्यातीवर चीनने बंधने घातल्याचे थेट फटका अमेरिकेच्या संरक्षण, संगणक आणि स्मार्टफोन उद्याोगांना बसण्याची शक्यता आहे. याबरोबरीनेच दुहेरी वापराच्या (लष्करी आणि घरगुती) वस्तूंची आयात करणाऱ्या १६ अमेरिकी कंपन्यांवरही बंदी घातल्याची माहिती चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने दिली. तसेच चीनच्या सीमाशुल्क विभागाने आपल्या देशात निर्यात करण्यासाठी अमेरिकेतील सहा कंपन्यांना मनाई केली आहे. ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनंतर चिनी मालावर सर्वाधिक ५४ टक्के कर लादला जाणार असून चीननेही जशास तशी करवाढ केल्याने व्यापारयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. अमेरिकेने एकतर्फी शुल्कवाढ लादण्यापेक्षा आपल्या व्यापारी भागिदारांबरोबर चर्चा करून योग्य पद्धतीने मार्ग काढायला हवा, अशी अपेक्षा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली.

अमेरिकेविरोधात डब्ल्यूटीओ’कडे धाव

बुधवारी ट्रम्प यांनी सुमारे ६० देशांवर एकतर्फी करवाढ लादल्यानंतर चीनने शुक्रवारी जागतिक व्यापार संघटनेचे (डब्ल्यूटीओ) दरवाजे ठोठावले. ट्रम्प यांनी केलेली करवाढ ही संघटनेच्या नियमांचे उल्लंघन असून नियमाधारित व्यापार पद्धतीला कमी लेखण्याचा प्रकार आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गुओ जिआकुन यांनी म्हटले आहे.

तुमचा एक… तर आमचे चार !

अमेरिकेच्या मालावर ३४ टक्के वाढीव आयातशुल्क

दुर्मिळ संयुगांची अमेरिकेला निर्यात करण्यावर निर्बंध

१६ अमेरिकी कंपन्यांना निर्यात करण्यास बंदी

चीनला निर्यातीस सहा अमेरिकन कंपन्यांना मनाई

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फटका फेड

ट्रम्प यांनी केलेल्या आयातशुल्क वाढीमुळे अमेरिकेमध्ये महागाई भडकण्याचा आणि अर्थव्यवस्थेची वाढ खुंटण्याचा धोका असल्याचे ‘फेडरल रिझर्व्ह’ या अमेरिकेतील मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. अशा स्थितीत चलनवाढ तात्पुरती राहील, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे बँकेचे अध्यक्ष जेरम पॉवेल यांनी म्हटले आहे. मात्र यावरून अमेरिकेच्या अध्यक्षांचा तिळपापड झाला असून ‘‘पॉवेल यांनी राजकारण करणे थांबवावे आणि व्याजदरांमध्ये कपात करावी,’’ असा अजब सल्ला ट्रम्प यांनी देऊ केला आहे.