पीटीआय, नवी दिल्ली
जगाच्या दृष्टीने चीन ही सामान्य समस्या असली तरी भारताच्या दृष्टीने चीन ही विशेष समस्या आहे आणि त्याचे स्वरूप अधिक गंभीर आहे, अशी स्पष्टोक्ती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी केली. एका कार्यक्रमात बोलताना परराष्ट्रमंत्र्यांनी भारत आणि चीनच्या संबंधांची चर्चा केली. सीमेवरील स्थिती आणि चीनबरोबर भारताचे संबंध कसे आहेत त्यावरून त्यांच्याकडून येणाऱ्या गुंतवणुकीची छाननी करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चीनबरोबरच्या व्यापारात तूट असल्याबद्दल लोक तक्रार करत असतील तर त्याचे कारण हे आहे, की काही दशकांपूर्वी आम्ही चीनमध्ये होणाऱ्या उत्पादनाच्या स्वरूपाकडे आणि त्यांना मिळणाऱ्या फायद्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. चीनचे अद्वितीय राजकारण, अद्वितीय अर्थकारण यामुळे तो देश एक अद्वितीय स्वरूपाची समस्या आहे असे मत जयशंकर यांनी व्यक्त केले. त्यांचे अद्वितीयपण लक्षात घेण्याचा प्रयत्न केल्याशिवाय, त्याविषयीची मते, निष्कर्ष आणि धोरणे सदोष असतील असा इशारा त्यांनी दिला. चीनबद्दल चर्चा करणारे आपण जगातील एकमेव नाही. युरोपमध्ये प्रमुख आर्थिक किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या चर्चेत चीनचा विषय असतो. अमेरिकाही चीनच्या कुरापतींनी त्रस्त आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा : Haryana Mob Lynching : गोमांस खाल्ल्याच्या संशयातून बेदम मारहाण करत मजुराची हत्या; एकजण गंभीर, सात आरोपी गजाआड

चीनची समस्या भारतापुरतीच मर्यादित नाही. जेव्हा आपण चीनबरोबर व्यापार, गुंतवणूक, विविध प्रकारची देवाणघेवाण करतो, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने हा खूप वेगळा देश आहे, हे लक्षात घेण्याकडे दुर्लक्ष केले तर त्यातून अनेक मूलभूत गोष्टी सुटू लागतात. गेल्या चार वर्षांपासून भीरत-चीन सीमेवर खूप कठीण परिस्थिती आहे. भारत घेत असलेली खबरदारी पाहता त्याला योग्य प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचे जयशंकर इतर देशांना उद्देशून म्हणाले. चीनमध्ये गुंतवणूक करू नये किंवा चीनबरोबर व्यापार करू नये, अशी सरकारची भूमिका कधीच नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.

गुंतवणुकीची छाननी होणार

गुंतवणुकीच्या मुद्द्यावर बोलताना जयशंकर म्हणाले की, ज्या देशांची सीमा चीनला लागून नाही, तेही तेथून होणाऱ्या गुंतवणुकीची छाननी करत आहेत. यासाठी त्यांनी अमेरिका, युरोपचे उदाहरण दिले. त्यामुळे चीनकडून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीची छाननी केली जाईल. त्यात मला वाटते की भारत-चीनदरम्यान सीमा आणि संबंधांची स्थिती यासाठी पूरक असावी, असेही जयशंकर यांनी सांगितले.

हेही वाचा : Kolkata Rape Murder : “कोलकाता हत्याकांडातील पीडितेचं कुटुंब नजकैदेत”, काँग्रेसचे ममता बॅनर्जी सरकारच्या कारभारावर ताशेरे

भयमुक्त जगाचा नारा

युरोपमध्ये मोठे युद्ध सुरू आहे, मध्य पूर्वेतही संघर्ष आणि आशियामध्ये तणाव आहे. प्रादेशिक दावे पुनरुज्जीवित करताना सीमा संघर्षाचे धोके वाढतात, असेही परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले. भयमुक्त जग करण्याचा नाराही त्यांनी या वेळी दिला. प्रत्येक देश आता भू-राजकीय जोखमींचे बारकाईने मूल्यांकन करत आहे. हे सर्व प्रयत्न भयमुक्तीकडे लक्ष केंद्रित करत असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China is a special problem for india says foreign minister s jaishankar css