काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडला आहे. SCO अर्थात शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचा उपयोग पाकिस्ताननं करू नये असे पाकिस्तानचा मित्र असलेल्या चीननेही ठणकावलं आहे. पाकिस्ताननं एससीओ मध्ये काश्मीरचा मुद्दा पुढे आणला तर चीन पाकच्या नापाक इराद्यांना कधीही पाठिंबा देणार नाही असेही चीनमधल्या राजकीय जाणकारांनी म्हटले आहे.
कुरापती काढण्यात हातखंडा असलेल्या पाकिस्तानला गेल्या अनेक दिवसांपासून काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचा आहे. मात्र चीनने याहीवेळी पाकिस्तानला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे या प्रश्नावर पाकिस्तानचे नापाक इरादे धुळीला मिळाले आहेत. काश्मीर प्रश्न द्विपक्षीय आहे त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची आहे, असं भारताने म्हटले आहे. काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यास चीन मदत करेल अशी अपेक्षा पाकिस्तानला होती. मात्र चीनने घेतलेल्या भूमिकेमुळे पाकिस्तानला कोणतंही पाठबळ मिळालेले नाही. आजपासून एससीओ शिखर परिषद सुरू होते आहे. सहा देशांचा यामध्ये सध्या समावेश आहे.
आज होणाऱ्या या परिषदेत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा सदस्य म्हणून समावेश होण्याचीही शक्यता आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या औपचारिकता आज पूर्ण केल्या जाऊ शकतात. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना गरज भासली तर एससीओ चे सदस्य दोन्ही देशांना मदत करू शकतात असं वृत्त ग्लोबल टाईम्सनं दिले आहे. अँटी-टेरिरीझम एक्सपर्ट ली वेई यांच्या प्रतिक्रियेनंतर ही बातमी देण्यात आली आहे. असे असले तरीही एससीओची शिखऱ परिषद भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वादाचा मंच होणार नाही, असेही मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा पाकिस्तानचा डाव पूर्णपणे फसला आहे.