सध्या जगभरामध्ये युक्रेन-रशिया युद्धामुळे चिंतेचं वातावरण असतानाच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक धोक्याचा इशारा दिलाय. युक्रेननंतर तैवानवर हल्ला होऊ शकतो अशी भीती ट्रम्प यांनी व्यक्त केलीय. चीन तैनाववर हल्ला करु शकतो असं सांगताना ट्रम्प यांनी चिनी राष्ट्राध्यक्षांची या छोट्याश्या देशावर नजर असल्याचं म्हटलंय.
तैवानवर हल्ल्याची शक्यता…
“तैवान हा (हल्ला होणारा) पुढील देश असेल. तैवानकडे लक्ष असू द्या. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे तैवानकडे फार उत्साहाने पाहत आहेत,” असं ट्रम्प म्हणालेत. फॉक्स बिझनेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं. रशियाने ज्याप्रमाणे युक्रेनवर हल्ला केला आहे, त्याच धर्तीवर चीन हा सध्या स्वयंशासित असलेल्या तैवानवर हल्ला चढवील असा अंदाज वर्तविला जात आहे.
नेते सक्षम नाहीत…
ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यावरही थेट टीका केली. “तैवानवर हल्ला होईल असं वाटण्यामागील मुख्य कारण म्हणजे अगदी बावळटासारखा अमेरिकेचा कारभार चाललाय,” असं ट्रम्प म्हणालेत. पुढे बोलताना, “त्यांना आपले नेते सक्षम वाटत नाहीत. त्यामुळे ते असं (हल्ला) करणार. सध्या त्यांचा काळ सुरुय,” असंही ट्रम्प म्हणाले.
त्यांनी अंदाज बांधलाय…
चीनचं युक्रेन-रशिया युद्धावर बरीक लक्ष असून यामधून चीन बरंच काही समजून घेतोय. अमेरिकने हे सारं कसं हातळलंय यावर त्यांची बारीक नजर असल्याचं ट्रम्प म्हणालेत. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून ज्या पद्धतीने काढता पाय घेतला त्यामधूनही चिनी राष्ट्राध्यक्षांनी बराच अंदाज बांधलाय, असंही ट्रम्प यांनी म्हटलंय.
ही त्यांना संधी…
“शी जिनपिंग हे फार हुशार आहेत. अफगाणिस्तानमध्ये काय झालं हे त्यांनी पाहिलंय. आपण कशापद्धतीने अफगाणिस्तान सोडलं, आपली माणसं तिथे सोडली हे त्यांनी पाहिलंय. ते सर्व पाहत असून सध्या त्यांना मनासारखं करण्याची संधी मिळालीय,” असं ट्रम्प यांनी म्हटलंय.
तैवानची अस्वस्थता वाढली
चीनने गेल्या काही महिन्यांत या भागात लष्करी सज्जता वाढविली आहे. तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्राच्या टप्प्यात चीनने शेकडो लढाऊ जेट विमाने तैनात केली आहेत. त्याशिवाय तेथे चीनचे नौदलही सज्ज आहे. त्यामुळे सध्या स्वयंशासित असलेल्या तैवानची अस्वस्थता वाढली आहे.
चीनचे प्रयत्न सुरु असल्याचा दावा
तैवान आणि अमेरिकेतील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रशियाने ज्या पद्धतीने आक्रमण केले आहे, ते पाहता आता चीनपासून तैवानला असलेला धोका अधिक तीव्रतेने लक्षात घेतला पाहिजे. तैवानचे वेगळे अस्तित्व नष्ट करून हे बेट चीनच्या थेट वर्चस्वाखाली आणण्याचे चीनचे प्रयत्न सुरू आहेत.
चीनने यापूर्वीच दिलाय इशारा
तैवानच्या स्वातंत्र्याच्या दाव्याला अमेरिका पाठिंबा देत असून त्याची अमेरिकेला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा मंगळवारी चीनने दिला. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी माजी संरक्षण अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ तैवानला पाठविले आहे. ते तैवानमध्ये दाखल झाले आहे.
अमेरिकने वाढवली चीनची चिंता
तैवानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे पाच सदस्यीय शिष्टमंडळ तैवानमध्ये दाखल झाले असून त्याचे नेतृत्व संयुक्त प्रमुखांचे (जॉईन्टस चीफ) माजी चेअरमन माईक मुलेन हे करीत आहेत. तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी त्यांचे स्वागत केले. तैवानबरोबर सख्य निर्माण करण्याच्या अमेरिकेच्या या प्रयत्नांमुळे चीनची चिंता वाढली आहे.
चीनचा आरोप
तैवान हासुद्धा मध्यवर्ती चीनचा एक भाग आहे, असा चीनचा दावा आहे. मुलेन यांच्या बरोबरच अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ हेसुद्धा बुधवारी तैवानमध्ये दाखल होणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मुलेन आणि पॉम्पिओ हे दोघेही त्यांच्या सातत्यपूर्ण चीनविरोधी भूमिकेसाठी ख्यात होते. ते तैवानच्या अध्यक्ष त्साई इंग-वेन यांची भेट घेणार आहेत. मुलेन आणि पॉम्पिओ हे दोघेही चीनविरोधी कारस्थानात पुढाकार घेत असल्याचा चीनचा आरोप आहे.
चीनने केलं आवाहन…
चीनची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक एकसंधता कायम ठेवण्यास चीनची जनता कटिबद्ध आहे. तैवानला पाठिंबा दर्शविण्याची जी अमेरिकेची धडपड सुरू आहे, ती व्यर्थ ठरणार आहे. त्यांनी तेथे कोणालाही पाठविले तरी फरक पडणार नाही. एक चीन हा सिद्धांत अमेरिकेने मान्य करावा, असे आमचे आवाहन आहे.