China Launched Pakistan Sattellite: भारतासाठी चीन व पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांकडून नेहमीच सुरक्षेबाबत आव्हानं निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन व पाकिस्तानची जवळीक अजिबात लपून राहिलेली नाही. दोन्ही राष्ट्रांनी परस्परांच्या हितसंबंधांसाठी साधलेली जवळीक भारताच्या हितसंबंधांसाठी मात्र त्रासदायक ठरण्याची शक्यता अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तान व चीन यांच्यातील हेच हितसंबंध अवकाश संशोधन स्तरावरही दृढ झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. गेल्या काही वर्षांत चीननं पाकिस्तानचे काही उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले असून आज चीननं पाकिस्तानच्या PRSC-EO1 या उपग्रहाचं प्रक्षेपण केलं आहे.
आज चीननं जियूक्वॅन सॅटेलाईट लाँच सेंटरवरून पाकिस्तानच्या पीआरएससी-ई०१ हा उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला. बीजिंमधील प्रमाणवेळेनुसार दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी चीनी बनावटीच्या लाँग मार्च टू डी कॅरियरच्या मदतीने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. प्रक्षेपणानंतर काही वेळातच हा उपग्रह त्याच्या नियोजित भ्रमणकक्षेत स्थिर झाला.
चीन व पाकिस्तान द्वीपक्षीय संबंध
गेल्या काही वर्षांमध्ये चीननं पाकिस्तानचे अनेक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. त्यामुळे भारताच्या या दोन्ही शेजारी देशांमधील अवकाशविषयक सहकार्याबाबतचे द्वीपक्षीय संबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होताना दिसत आहेत. गेल्या वर्षी चीननं पाकिस्तानसाठी मल्टिमिशन कम्युनिकेशन सॅटेलाईटचं प्रक्षेपण केलं. २०१८ साली चीननं पाकिस्तानच्या दोन उपग्रहांचं यशस्वीरीत्या प्रक्षेपण केलं होतं. त्यात पीआरएसएस – १ हा पाकिस्तानचा पहिला रिमोट सेन्सिंग उपग्रह व पीएकेटीईएस-१ए या उपग्रहांचा समावेश होता.
पाकिस्तानच्या उपग्रहाव्यतिरिक्त चीने स्वदेशी बनावटीचे टियानलू १ व लँटन १ हे दोन उपग्रहदेखील प्रक्षेपित केले. चीनच्या सदर प्रक्षेपकाच्या मदतीने झालेलं ही ५५६वं यशस्वी प्रक्षेपण ठरलं आहे.