चीनने पाचव्या समानव अंतराळ मोहिमेत आज एका महिलेसह तीन अंतराळवीरांना शेनझाऊ १० अंतराळयानातून अवकाशात पाठवले. येत्या इ. स. २०२०पर्यंत अंतराळात कायमस्वरूपी अंतराळ प्रयोगशाळा उभारण्याचा चीनचा विचार आहे. चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग हे शेनझाऊ-१०चे उड्डाण पाहण्यास उपस्थित होते. गान्शू प्रांतातील जियाक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून हे अवकाशयान यशस्वीरीत्या अवकाशात झेपावले. पंधरा दिवस ते टिआंगाँग-१ या अंतराळ प्रयोगशाळेशी जोडले जाणार असून हे अंतराळवीर तेथे काही प्रयोग करणार आहेत. लाँग मार्च दोन एफ या प्रक्षेपक अग्निबाणाने हे अंतराळयान सोडण्यात आले. जिया क्वान येथील नियंत्रण कक्षात चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग अंतराळवीरांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. तुम्ही चिनी लोकांना अभिमान वाटावा अशीच कामगिरी करीत आहात असे त्यांनी सांगितले. चीनचे अवकाश स्वप्न घेऊन तुम्ही जाता आहात, चिनी लोकांच्या आशाआकांक्षा तुमच्यावर केंद्रित आहेत, तुम्ही विजयी होऊन परत याल, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. गेल्या वर्षी चीनचे अंतराळवीर १३ दिवस अंतराळात होते. आता ते १५ दिवस अंतराळात वास्तव्य करणार आहेत. वँग यापिंग या चीनच्या दुसऱ्या महिला अंतराळ वीरांगना असून यापूर्वी लिउ यांग यांनी गेल्या वर्षी अंतराळवारी केली होती. आताच्या मोहिमेचे कमांडर नी हेशेंग असून त्यांनी चीनच्या २००५ मधील मोहिमेत भाग घेतला होता. झांग शियोग्वांग हे तिसरे अंतराळवीर या मोहिमेत आहेत.श्रीमती वँग या पूर्व चीनमधील एका शेतकरी कुटुंबातील असून गेल्या वर्षी त्यांचा पहिल्या महिला अंतराळवीरांगना होण्याचा मान हुकला होता. त्या हवाई दलात वैमानिक असून त्या वेळी लिउ यांग यांची त्यांच्याऐवजी निवड झाली होती. चीनची सुसज्ज प्रयोगशाळा अंतराळात उभारण्यात येणार असून तिचे काम इ.स. २०२०पर्यंत पूर्ण होणार आहे. तोपर्यंत मीर या रशियाच्या अवकाशस्थानकाचा कार्यकाल संपलेला असेल. या वेळी चीनचे अंतराळवीर शेनझाऊ १० अंतराळयानातून पृथ्वीवरील विद्यार्थ्यांना व्हिडिओ फीड माध्यमातून शिकवणार आहेत. त्यामुळे वँग या अंतराळातून मुलांना शिकवणाऱ्या चीनच्या पहिला महिला शिक्षिका ठरणार आहेत.
पाचव्या समानव अंतराळ मोहिमेत महिलेसह तीन चिनी अंतराळवीर अवकाशात
चीनने पाचव्या समानव अंतराळ मोहिमेत आज एका महिलेसह तीन अंतराळवीरांना शेनझाऊ १० अंतराळयानातून अवकाशात पाठवले. येत्या इ. स. २०२०पर्यंत अंतराळात कायमस्वरूपी अंतराळ प्रयोगशाळा उभारण्याचा चीनचा विचार आहे. चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग हे शेनझाऊ-१०चे उड्डाण पाहण्यास उपस्थित होते. गान्शू प्रांतातील जियाक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून हे अवकाशयान यशस्वीरीत्या अवकाशात झेपावले.
Written by badmin2
First published on: 12-06-2013 at 01:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China launches fifth manned space mission with three astronauts including woman