man heart attack at china train station: तरुण किंवा पन्नाशीच्या खालील लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. कामाचा ताण, बदललेली जीवनशैली, व्यायाम आणि सकस आहाराची कमतरता अशी अनेक कारणे यासाठी कारणीभूत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. मृत्यूचा धोका वाढलेला असतानाही काही लोक नोकरीला महत्त्व देताना दिसतात. अशी एक विचित्र घटना चीनच्या हुनान प्रांतात घडली आहे. ४ फेब्रुवारी रोजी हुनान प्रांतातील चांगशा रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती हृदयविकाराचा झटका आल्यामुळे खाली कोसळला. त्यानंतर त्यावर प्राथमिक उपचार करून शुद्धीवर आणले असतो, तो आराम करण्याऐवजी थेट कामावर निघून गेला. या व्यक्तीच्या वृत्तीची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, ४० वय असलेल्या एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर रेल्वे स्थानकातील कर्मचारी आणि डॉक्टर तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सदर रुग्णाला प्राथमिक उपचार देऊ केले. २० मिनिटांनी सदर व्यक्ती शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर रेल्वे कर्मचारी त्याला आरामाचा सल्ला देणार तोच या व्यक्तीने जे म्हटले, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शुद्धीवर येताच सदर व्यक्ती म्हणाला, “मला अतिजलद ट्रेन पकडायची आहे. मला कामावर गेलेच पाहीजे.”
या व्यक्तीने घेतलेल्या भूमिकेमुळे गोंधळलेल्या डॉक्टरही चक्रावले. “तुला तातडीने उपचाराची गरज आहे. खाली पडल्यामुळे तुला दुखापत झाल्याची शक्यता आहे”, असे सांगून डॉक्टरांनीही वाद घातला. दोघांमध्ये थोडी वादावादी झाल्यानंतर सदर व्यक्तीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात जाण्यास होकार दिला.
मध्यप्रदेशमध्ये नुकतेच एका ३० वर्षीय युवतीचा लग्नात नृत्य करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्रसंग समोर आलेला आहे. कामाच्या ताणामुळेही अनेक तरुणांना हृदयविकाराचा धक्का आल्याचे प्रसंग घडलेले आहेत. यामुळे ताण-तणावापासून दूर राहण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.
सोशल मीडियावर काय चर्चा आहे?
चीनसह जगभरातील सोशल मीडिायमध्ये या विषयाची जोरदार चर्चा आहे. काही युजर्सनी म्हटले की, सकाळी उठल्या उठल्या या व्यक्तीला पैसे कमविण्याची चिंता सतावत असेल. त्यामुळेच त्याला असा निर्णय घ्यावा लागला असावा. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले, “हा एकटाच नाही, जो घराच्या कर्जाचा, मुलांचा शिक्षणाचा डोलारा एकट्याच्या खांद्यावर उचलतोय. समाजातील अनेक लोक याच दुःखात आहेत.”
चीनमध्ये बेरोजगारीचे संकट
या घटनेमुळे चीनमधील वाढलेल्या बेरोजगारीची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. नोव्हेंबर २०२३ मधील एका अहवालानुसार, चीनमध्ये १६ ते २४ वयोगटातील विद्यार्थी वगळता बेरोजगारीचा दर १६.१ टक्के इतका आहे.