US-China Trade War: काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसह काही देशांवर अतिरिक्त व्यापार शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चीननेही ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत अमेरिकेवरही व्यापार शुल्क लादले होते. यामुळे सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशात या आठवड्यात अमेरिकेकडून चीनबरोबरच्या तणावात काही प्रमाणात घट होईल असे संकेत दिले होते. मात्र, चीनने आज स्पष्ट केले आहे की, त्यांची सध्या अमेरिकेबरोबर टॅरिफबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू नाही.
चीनच्या निर्यातीवरील अंतिम कर दर सध्याच्या १४५ टक्क्यांवरून बऱ्यापैकी कमी होतील, असे ट्रम्प यांनी मंगळवारी म्हटल्यानंतर चीनने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
“चीनची भूमिका पहिल्यापासून तीच असून, आम्ही चर्चेसाठी आणि यावर मार्ग काढण्यासाठी सकारात्मक आहोत, परंतु कोणत्याही प्रकारची चर्चा आणि वाटाघाटी परस्पर आदराच्या आधारावर व समान पद्धतीने केल्या पाहिजेत,” असे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते हे यादोंग यांनी म्हटले आहे. याबाबत सीएनबीसीने वृत्त दिले आहे.
ते पुढे म्हणाले की, “चीन-अमेरिका यांच्यातील व्यापार वाटाघाटींमध्ये प्रगती होत असल्याबद्दलचे दावे निराधार आहेत. या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. जर अमेरिकेला खरोखरच ही समस्या सोडवायची असेल तर त्यांनी चीनवरील सर्व एकतर्फी कर रद्द करावेत.”
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला असे संकेत दिले की, अमेरिकेचा चीनबरोबरचा तणाव कमी होऊ शकतो. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेने चिनी वस्तूंवर १४५% कर लादले होते. याला उत्तर म्हणून चीननेही अमेरिकेवर व्यापर शुल्क लादले होते. याचबरोबर अमेरिकेला निर्यात होणाऱ्या महत्त्वाच्या खनिजांच्या निर्यातीवर निर्बंध वाढवले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले होते की, ते चीनवर लादलेला १४५ टक्के कर कमी करण्यास तयार आहेत, परंतु हे कर “शून्य होणार नाहीत.” याचबरोबर, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट यांनी गुंतवणूकदारांसोबतच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत सांगितले की, चीनसोबतचा संघर्ष जास्त काळ टिकू शकत नाही आणि परिस्थिती लवकरच शांत होऊ शकते.
दरम्यान बुधवारी, चिनी अधिकाऱ्यांनीही व्यापार चर्चा पुन्हा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु धोक्याच्या वातावरणात चर्चा पुढे जाऊ शकत नाही असा इशारा त्यांनी दिला होता.