भारतीय सीमाभागावरील चिनी घुसखोरीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करत आहे. अलीकडेच अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से सीमाभागात चिनी सैनिक आणि भारतीय लष्कराच्या जवानांमध्ये झटापट झाल्याचं समोर आलं होतं. यावरून केंद्र सरकारचं चीन धोरण पूर्णपणे चुकलं आहे, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला होता. याला उद्देशूनच आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
एस जयशंकर हे पुणे दौऱ्यावर होते. तेव्हा भारतीय जमिनीवर चीनने केलेल्या घुसखोरीवर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा एस जयशंकर म्हणाले, “चीनने भारताच्या जमिनीवर १९६२ सालीच घुसखोरी केली होती. हे विरोधी पक्षातील लोक सांगणार नाही. जसे की चीनने अलीकडेच भारताच्या जमिनीवर कब्जा केला आहे, असं विरोधी पक्ष दाखवतो.”
हेही वाचा : ‘भारत जोडो’मुळे काश्मीरमध्ये मोकळे वारे – मुफ्ती
भारत आणि चीन सीमेवर २०१७ साली तणाव निर्माण झाला होता. तेव्हा राहुल गांधींची चीनच्या राजदूताबरोबर बैठक झाल्याचं समोर आलं होतं. यावरूनही एस जयशंकर यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. “जर मला काही ( चीनबद्दल ) जाणून घ्यायचं झालं, तर चीनच्या राजदूताकडे जाणार नाही. माझ्या देशातील लष्कर प्रमुखाकडे जाणार,” असं एस जयशंकर यांनी म्हटलं.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से सीमाभागात चिनी सैनिक आणि भारतीय लष्कराच्या जवानांत ९ डिसेंबरला झटापट झाली होती. यात दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले होते. यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. “केंद्र सरकारचं चीन धोरण पूर्णपणे चुकलं आहे. सरकारकडून लष्कराच्या मागे लपून स्वत:च्या बचावाचा प्रयत्न होत आहे. पण, सीमेवर काय घडलं ते सर्वांना सांगा. मी सरकारबद्दल काही भाष्य केलं, तर लष्कराविरोधात बोललो असल्याचं सांगत दिशाभूल करण्यात येते,” असं राहुल गांधी म्हणाले होते.
हेही वाचा : “माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे” खरेखुरे रँचो सोनम वांगचुक यांनी केला आरोप
“काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या पाठिशी आहेत. पण, चिनी घुसखोरी केल्याचं मान्य करत, चुकांची कबुली दिली पाहिजे. घुसखोरी झाली नसल्याचा दावा केल्याने चीनचं फावलं आहे. चीन आणि पाकिस्तान आपल्याविरोधात एकत्र येत आहे,” असा दावाही राहुल गांधींनी केला होता.