पीटीआय, नवी दिल्ली : पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरचा भाऊ आणि संघटनेचा उपप्रमुख अब्दूल रौफ अजहर याला काळय़ा यादीत टाकण्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आयोगाचा प्रस्ताव चीनने रोखून धरला. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांचा असलेला हा प्रस्ताव दुसऱ्यांदा चीनमुळे मंजूर होऊ शकला नाही. केवळ राजकीय हित साधण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले असून दहशतवादाविरोधात त्यांचा लढा ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अब्दुल रौफ याचा भारतात झालेल्या अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग होता. १९९९मध्ये भारतीय विमानाचे अपहरण, २००१मध्ये संसदेवर झालेला हल्ला आणि पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेला हल्ला अशा प्रकारे अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये रौफचा सहभाग होता. त्यामुळे त्याला काळय़ा यादीत टाकण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याला जर काळय़ा यादीत टाकण्यात आले असते तर त्याच्यावर जागतिक प्रवास बंदी घालण्यात आली असती. तसेच पाकिस्तानातील त्याची मालमत्ता गोठवण्याची आणि शस्त्रे आणि संबंधित सामग्रीचा प्रवेश बंद करता आली असती.

रौफला काळय़ा यादीत टाकण्यासाठी भारत आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडलेल्या संयुक्त प्रस्तावावर चीनने बुधवारी तांत्रिकदृष्टय़ा रोखून ठेवला. संयुक्त राष्ट्रांच्या अन्य सर्व १४ सदस्य राष्ट्रांनी या निर्णयाला पाठिंबा दिला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China opposes blacklisting jaish e mohammed terrorist ysh