ज्या अविवाहित महिलांना विवाहित पुरुषांपासून मुले असतील त्यांना मोठय़ा प्रमाणात दंड करण्याचा कायदा मध्य चीनमधील एका प्रादेशिक प्रशासनाने प्रस्तावित केला असून, त्याविरोधात मोठय़ा प्रमाणावर टीका होत आहे. मध्य चीनमधील वुहान शहरात हा कायदा लागू करण्यात येणार आहे, त्यातील तरतुदीनुसार अविवाहित महिलांना मुले असतील तर त्यांना दंड केला जाणार आहे. या प्रस्तावित कायद्यास तज्ज्ञ व शहरातील रहिवाशांनी विरोध केला आहे.
वुहान लोकसंख्या व कुटुंबनियोजन व्यवस्थापन कायदा या नावाने या प्रस्तावित कायद्याचा मसुदा शहराच्या प्रशासनाने जारी केला असून, त्यातील तरतुदीनुसार ज्या महिला अविवाहित असतील व ज्यांनी जाणूनबुजून विवाहित पुरुषाशी विवाह केला असेल आणि त्यातून त्यांना मूल झाले असेल तर त्यांना दंड करण्यात येईल.जन्मदर कमी ठेवून कुटुंबनियोजन करणे असाच या प्रस्तावित कायद्याचा हेतू आहे. चीनमध्ये अजूनही एक मूल धोरण कठोरपणे राबवले जात आहे. अधिकाऱ्यांनी या कायद्याचा मसुदा ऑनलाइन टाकला असून त्यात म्हटले आहे, की लोकांच्या सूचना व प्रतिक्रियांचा विचार केला जाईल. सात जूनपर्यंत या सूचना पाठवायच्या आहेत.
एखाद्या अविवाहित महिलेला विवाहित पुरुषापासून मूल झाले असेल तर तिने तिच्या अगोदरच्या वर्षांतील सरासरी उत्पन्नाच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून भरायची आहे, असे या कायद्यात म्हटले आहे.
चीनच्या कुटुंबनियोजन कायद्यानुसार जास्त मुले झाली तर नियम मोडणाऱ्यांना सामाजिक भरपाई शुल्क भरावे लागणार आहे व सरकारी कर्मचाऱ्यांनाही प्रशासकीय शिक्षा भोगावी लागणार आहे. अनेक भागांत यासाठीचा दंड हा आधीच्या वर्षांतील सरासरी उत्पन्नाच्या तीनपट आहे. २०११च्या आकडेवारीनुसार अविवाहित स्त्रियांना मुले असण्याचे प्रमाण वाढले आहे, कारण त्या नोकरीही करीत आहेत. एकूण महिला लोकसंख्येच्या हे प्रमाण २० टक्के आहे. नानकाई विद्यापीठाचे लोकसंख्या अभ्यास प्राध्यापक हुआन शिन यांच्या मते विवाहबाहय़ संबंधातून जन्मलेल्या मुलांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी असा कायदा केला गेला तरी त्याची अंमलबजावणी समाजातील गुंतागुंतीमुळे अवघड आहे. चिनी समाज हा अधिक खुला व वैविध्यपूर्ण आहे, त्यामुळे कुटुंब नियोजनात अनेक जटिल समस्या आहेत. एखाद्या महिलेने टेस्ट टय़ूब बेबी तंत्राने मूल जन्माला घातले असेल तर तिला दंड करणार का, असा सवाल प्राध्यापक वँग क्वियोंग यांनी केला आहे.
चीनमधील वादग्रस्त लोकसंख्या नियंत्रण कायद्यास विरोध
ज्या अविवाहित महिलांना विवाहित पुरुषांपासून मुले असतील त्यांना मोठय़ा प्रमाणात दंड करण्याचा कायदा मध्य चीनमधील एका प्रादेशिक प्रशासनाने प्रस्तावित केला असून, त्याविरोधात मोठय़ा प्रमाणावर टीका होत आहे.
First published on: 04-06-2013 at 04:47 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China people against controversil population control act