पीटीआय, नवी दिल्ली
चीनकडून सीमेवरील करारांचे सातत्याने होत असलेले उल्लंघन म्हणजे दोन देशांमधील संबंधांचा पाया खिळखिळा करणे आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षणमंत्री लि शांगफू यांना खडसावले. नवी दिल्ली येथे शुक्रवारी शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंह व शांगफू यांच्यात गुरुवारी द्विपक्षीय चर्चा झाली.
मे २०२०मध्ये लडाख सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झडल्यानंतर चिनी संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. ४५ मिनिटे चाललेल्या या बैठकीमध्ये भारत-चीनमधील संबंध हे सीमेवरील शांततेवर अवलंबून आहेत, असे सिंग यांनी स्पष्ट केले. भारताला चीनसोबत संबंध आणखी चांगले व्हायला हवे आहेत. मात्र सीमेवर शांतता प्रस्थापित झाल्यानंतर संरक्षण क्षेत्रामधील संबंध प्रस्थापित करता येतील. भारत-चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी लष्करी पातळीवर चर्चेच्या १८ फेऱ्या झाल्या आहेत. मात्र त्यानंतरही तीन वर्षांपासून असलेला तणाव अद्याप पूर्णत: निवळलेला नाही.
संरक्षणमंत्र्यांची आज परिषद
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील शांघाय सहकार्य परिषदेच्या संरक्षणमंत्र्यांची परिषद आज, शुक्रवारी नवी दिल्लीत होत आहे. प्रादेशिक सुरक्षेबाबतची वेगाने बदलणारी परिस्थिती, अफगाणिस्तानातील घडामोडी, दहशतवाद व कट्टरवाद यांचा परिणामकारक मुकाबला करण्याचे मार्ग हे यातील प्रमुख मुद्दे राहणार आहेत. चीन, ताजिकिस्तान, इराण व कझाकस्तान या देशांचे संरक्षणमंत्री या परिषदेसाठी दिल्लीला पोहोचले आहेत. रशिया, उझबेकिस्तान व किर्गिझस्तान या देशांचे संरक्षणमंत्रीही सहभागी होणार आहेत.