एपी, बीजिंग
समाजातील वृद्धांची संख्या वाढत असताना आणि जन्मदर झपाटय़ाने कमी होत असताना चीनमध्ये अलीकडच्या काही वर्षांत लोकसंख्येत पहिल्यांदाच एकूण घट झाली असल्याचे त्या देशाने जाहीर केले आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात २०२२ च्या तुलनेत ८ लाख ५० हजार कमी लोक होते, असे चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने नमूद केले. चीन केवळ चीनच्या मुख्य भूमीवरील लोकसंख्या मोजतो आणि हाँगकाँग व मकाऊ या देशांना, तसेच परदेशात राहणाऱ्या आपल्या नागरिकांना त्यातून वगळतो.
देशाची लोकसंख्या १.४११.७५ अब्ज होती आणि गेल्या वर्षी ९० लाख ५६ हजार जन्म आणि १ कोटी ४१ लाख मृत्यूंची नोंद करण्यात आली, असे संस्थेने मंगळवारी सांगितले.कठोरपणे राबवलेल्या ‘एकच मूल’ या धोरणाचा परिणाम म्हणून, तसेच कुटुंबाचा वारसा चालवण्यासाठी पारंपरिकरीत्या मुलीपेक्षा मुलाला पसंती यामुळे लोकसंख्येत पुरुषांचे प्रमाण (७२२.०६ दशलक्ष) महिलांच्या तुलनेत (६८९.६९ दशलक्ष) अधिक असल्याचे संस्थेने नमूद केले. ‘एकच मूल’ हे धोरण अधिकृतरीत्या २०१६ साली रद्द करण्यात आले.
अर्थव्यवस्थाही खालावली
शून्य कोविड धोरण आणि रिअल इस्टेट बाजारपेठेतील मंदी यांचा जोरदार फटका बसल्याने चीनची अर्थव्यवस्था २०२२ साली तीन टक्क्यांपर्यंत खाली घसरली. जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये गेल्या ५० वर्षांत नोंदला गेलेला हा अर्थव्यवस्थेचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी वाढीचा दर आहे.